वर्ल्ड कप स्पर्धेत सलग १० सामने जिंकून फायनलमध्ये पोहोचलेल्या भारतीय संघाला पराभूत करत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा जगज्जेते होण्याचा मान मिळवला. भेदक गोलंदाजीने भारताला २४० धावांवर रोखल्यानंतर ट्रॅव्हिस हेडच्या शतकी खेळीच्या जोरावर कांगारुंनी ६ विकेट्स राखून भारतावर विजय साकारला आणि घरच्या मैदानात होत असलेल्या या अंतिम सामन्यात विजय मिळवण्याच्या टीम इंडियाच्या स्वप्नांचा चुराडा झाला. भारतासारख्या मजबूत संघाला पराभूत करत वर्ल्ड कप जिंकल्याने ऑस्ट्रेलियन संघावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र आता ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्शचा एक वादग्रस्त फोटो समोर आला असून क्रिकेट चाहत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचा भाग होणं, हे प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. हे स्वप्न साकार झाल्यानंतर खेळाडू या ट्रॉफीसोबत फोटोसेशन करतात. तसंच काही खेळाडू तर ट्रॉफीचं चुंबन घेत आपला आनंद साजरा करतात. फुटबॉल वर्ल्ड कप जिंकल्यानंतर स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सी हा रात्रभर ट्रॉफीसोबत झोपल्याचा फोटोही व्हायरल झाला होता. परंतु काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शचा ट्रॉफीसोबतचा फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोत मिशेल मार्श हा चक्क ट्रॉफीवर पाय ठेवून बसल्याचं दिसत आहे.
चाहत्यांचा संताप
मिशेल मार्शचा वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवल्याचा फोटो समोर आल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. माधव शर्मा या चाहत्याने 'एक्स'वर लिहिलं आहे की, "वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्यासाठी क्रिकेटर्स आयुष्यभर झगडत असतात. मात्र फक्त कूल दिसण्यासाठी मिशेल मार्शने ट्रॉफीवर पाय ठेवून फोटो काढला आहे. हे अत्यंत धक्कादायक आणि खेदजनक आहे."
काही क्रिकेट चाहत्यांनी तर मिशेल मार्शचा निषेध करत त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आयसीसीकडे केली आहे.
दरम्यान, फायनलमध्ये धडक देण्याआधी साखळी सामन्यांत ९ संघांचा केलेला पराभव आणि सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला चितपट करत फायनलमध्ये धडक दिलेल्या भारतीय संघाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र प्रथम फलंदाजी करताना चांगल्या सुरुवातीनंतर ठराविक अंतराने भारताचा एकामागून एक खेळाडू तंबूत दाखल होत गेला आणि भारताने ऑस्ट्रेलियासमोर २४१ धावांचं माफक आव्हान ठेवलं. भारताने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज लवकर बाद झाले. मात्र नंतर ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेनने मोठी भागिदारी करत भारताच्या स्वप्नांचा चुराडा केला.