Join us  

VIDEO : भारताचा पराभव सहन होईना, राष्ट्रवादीच्या आमदाराची लेक ढसाढसा रडली!

टीम इंडियाच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या आमदार कन्येलाही रडू कोसळलं. याबाबतचा व्हिडिओ त्यांनी 'एक्स'वर शेअर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 4:13 PM

Open in App

तुफान फॉर्ममध्ये असलेली टीम इंडिया वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्याने करोडो भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. भारताच्या फलंदाजीवेळी सुरुवातीची काही षटके सोडली तर संपूर्ण सामन्यादरम्यान कांगारुंनी वर्चस्व गाजवलं. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने सामन्याआधी उच्चारलेले शब्द अक्षरश: खरे करून दाखवले. भारताच्या लाखो दर्शकांना आपल्या कामगिरीने शांत करणं, ही एक आनंदाची गोष्ट असेल, असं तो म्हणाला होता. सांघिक कामगिरीच्या जोरावर त्याने फायलनमध्ये अगदी अशीच काहीशी स्थिती निर्माण केली होती. भारताने वर्ल्ड कप गमावताच देशभरातील क्रिकेट चाहते हळहळले. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. अशीच काहीशी स्थिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अहमदनगर जिल्ह्यातील आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या कन्येची झाली होती. आमदार तनपुरे यांनी याबाबतचा व्हिडिओ 'एक्स'वर शेअर केला आहे.

भारताच्या पराभवानंतर आमदार प्राजक्त तनपुरे यांची कन्या ढसढसा रडू लागली. हा प्रसंग शेअर करताना तनपुरे यांनी म्हटलं आहे की, "भारताच्या पराभवाने कोट्यवधी भारतीयांची मने दुखावली. माझी कन्या आरोहीदेखील त्याला अपवाद नव्हती. आरोहीने आजच्या मॅचसाठी आणि भारताच्या विश्वविजेतेपदासाठी खूप तयारी केली होती. पण शेवटी खेळात आणि आयुष्यात हार-जीत चालू असते. पराभव पचवून पुन्हा उभारी घ्यायची असते," या कॅप्शनसह त्यांनी मुलीचा व्हिडिओ शेअर केला. तसंच भारतीय टीम पूर्ण स्पर्धेत खूप चांगली खेळली.पण आजचा दिवस आपला नव्हता. ऑस्ट्रेलिया टीमचे अभिनंदन, असंही त्यांनी म्हटलं आहे.

कर्णधार रोहित शर्मालाही अश्रू अनावर!

यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. जवळपास सर्वच सामन्यांमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाडत आपल्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर रोहित संघाला चांगली सुरुवात करून देत असत. अंतिम सामन्यातही त्याने पॉवर प्लेममध्ये भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. मात्र रोहित आऊट होताच संघाला गळती लागली आणि एकापाठोपाठ एक फलंदाज आऊट होत गेले. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर आपण २४० धावांचंच आव्हान ठेवू शकलो. हे माफक आव्हान कांगारुंनी ६ विकेट्स राखून पूर्ण केले. वर्ल्ड कप स्पर्धेत सलग १० सामने जिंकल्यानंतर फायनलमध्ये झालेला पराभव कर्णधार रोहित शर्माच्याही जिव्हारी लागला. सामना गमावल्यानंतर भर मैदानातच रोहितला रडू कोसळलं. रोहितची ही स्थिती पाहून भारतीय क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यांच्या कडाही ओलावल्याचंही चित्र पाहायला मिळालं. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपरोहित शर्माभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराष्ट्रवादी काँग्रेस