वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. टीम इंडियाने या स्पर्धेतील सलग १० सामने जिंकले असल्याने भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या असून विजयासाठी देशभरात प्रार्थना केल्या जात आहेत. मात्र तिसऱ्यांदा विश्वविजेता होण्यासाठी भारतीय संघाच्या मार्गात बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम होणाऱ्या या ग्रँड फायनलआधी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने संघाला सावध केलं असून कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबतचा कानमंत्र दिला आहे.
ऑस्ट्रेलियाची जमेची बाजू सांगत युवराज सिंगने म्हटलं आहे की, "ऑस्ट्रेलियाने यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत खूपच चांगली कामगिरी केलीय, असं नाही. मात्र तरीही ते सेमीफायनलपर्यंत नक्की पोहोचतील, असं वाटत होतं. कारण हा संघ अनुभवी आहे. मोठ्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत विजय मिळवण्याचा त्यांचा जो इतिहास आहे, तो भारतासाठी चिंतेचा ठरू शकतो. ही परिस्थिती भारताचा संघ कसा हाताळतो, हे बघावं लागेल. मात्र भारत सध्या चांगली कामगिरी करत असल्याने ऑस्ट्रेलियाकडे फक्त एकच संधी आहे. ती म्हणजे भारताची पहिल्या तीन फलंदाजांना लवकर बाद करणं. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहलीला ते लवकर बाद करू शकले, तरंच भारताला हरवणं शक्य होईल."
'हिटमॅन'वर कौतुकाचा वर्षाव
वर्ल्ड कप फायनलविषयी बोलत असताना युवराज सिंगने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. "रोहित टीमसाठी खेळतो आणि त्याने या संपूर्ण स्पर्धेदरम्यान चांगल्या प्रकारे नेतृत्व केलं आहे. तसंच गोलंदाजांचा योग्य वापर करण्यात तो यशस्वी ठरला आहे," असं युवराजने म्हटलं आहे. "जेव्हा २००३ मध्ये वर्ल्ड कप फायनलमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना झाला होता, तेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य होता आणि आता जेव्हा पुन्हा दोन्ही संघ आमने-सामने आले आहेत तेव्हा भारताचा संघ अजिंक्य आहे. आजच्या सामन्यात भारत मजबूत दिसत असून आपल्याला जिंकण्याची संधी आहे," असं मतही युवराजने व्यक्त केलं आहे.
दरम्यान, यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवत साखळी सामन्यात ९ संघांचा पराभव केला. तसंच सेमीफायनलमध्येही न्यूझीलंडला चितपट करत फायनलमध्ये धडक दिली आहे. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची तडाखेबंद सुरुवात आणि नंतर विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुलच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर भारताने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. तसंच भारताचे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह हेदेखील जादुई फॉर्मात आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवत वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे.