IND vs AUS WTC Final: लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल ( Kl Rahul) याने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ( IPL 2023) मधून माघार घेतली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या घरच्या मैदानावरील झालेल्या लढतीत केएल राहुलला दुखापत झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुलने लखनौच्या कॅम्पमधून माघार घेतली अन् उपचारासाठी मुंबईत स्कॅनसाठी दाखल झाला.
७ ते ११ जून या कालावधीत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील ओव्हल मैदानावर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल होणार आहे. या सामन्याला केएल राहुल मुकण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेऊन आहे. मात्र राहुलच्या जागी टीम इंडियात कोणाला संधी मिळणार याची चर्चा रंगली आहे.
केएल राहुलने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेतल्यास यष्टिरक्षक इशान किशनची निवड होऊ शकते. तो नुकताच टीम इंडियासोबत होता. तर सध्या तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळत आहे. पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक केएस भरत आधीच टीम इंडियामध्ये आहे. टीम इंडिया २३ मे रोजी लंडनला रवाना होऊ शकते असे सांगण्यात येत आहे. आयपीएलमध्ये प्ले ऑफमध्ये खेळणारे खेळाडू नंतर संघात सामील होतील.
भारतीय संघ- रोहित शर्मा, शुबमन गिल, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत
ऑस्ट्रेलिया- पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), स्कॉट बोलँड, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, अॅलेक्स कॅरी, कॅमरून ग्रीन, मार्क हॅरिस, जोस हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोस इंग्लिस, उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क.