भारतीय संघातील खेळाडूंनी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय कसोटी मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरला पर्थच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या लढतीआधी भारतीय संघानं पर्थ येथील जुन्या टेस्ट वेन्यू असलेल्या वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन (WACA) च्या मैदानात सरावाला सुरुवात केली आहे.
एका पत्रकारानं पुराव्यासह शेअर केला सरावाच्या पहिल्या दिवसांतील खास किस्सा
ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, WACA ग्राउंड नेट्ससह कव्ह करण्यात आले आहे. नागरिकांना या परिसरात फिरकण्याची परवानगीही नाही. भारतीय संघानं सीक्रेट ट्रेनिंग कॅम्पसह सरावाला सुरुवात केली आहे. या दरम्यान ट्रिस्टन नावाच्या एका पत्रकारानं टीम इंडियाच्या सीक्रेट ट्रेनिंग कॅम्पमधील काही व्हिडिओ ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले आहेत. एवढेच नाही तर भारतीय संघाच्या सरावा वेळी घडलेला खास किस्सा फोटोतील पुराव्यासह त्याने शेअर केल्याचे दिसून येते.
यशस्वीची तगडी प्रॅक्टिस, स्टेडियम बाहेर मारलेल्या चेंडूचा फोटो होतोय व्हायरल
ट्रिस्टन नावाच्या पत्रकाराने जो किस्सा शेअर केलाय तो भारतीय युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल संदर्भातील आहे. युवा क्रिकेटरनं एवढ्या जोरात फटका मारला की, चेंडू रस्त्यावर येऊन पडला. नशीब रस्त्यावर एखादे वाहन किंवा व्यक्ती नव्हती. जवळ असणारी शाळाही आधीच सुटली होती. या आशयाच्या कॅप्शनसह ट्रिस्टन याने रस्त्यावर पडलेल्या रेड बॉलचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
कोहलीसोबत ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रात झळकला यशस्वी
भारतीय संघ बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियात पोहचल्यानंतर किंग कोहलीसोबत यशस्वी जैस्वालचीही हवा झाली होती. ऑस्ट्रेलियन प्रसार माध्यमांनी यशस्वीचा उल्लेख टीम इंडियाचा नवा किंग असा केला. या गोष्टीमुळे तो ऑस्ट्रेलियात एन्ट्री मारताच चर्चेत आला होता. नव्या किंगचा टॅग लागल्यावर सरावा वेळी त्याने तगडी फटकेबाजी करत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत धमाका करण्याचे संकेत दिल्याचे दिसते.