India vs Bangladesh 1st ODI Live Update : शाकिब अल हसनने ( Shakib Al Hasan) भारतीय फलंदाजांना पहिल्या वन डे सामन्यात नाक घासायला भाग पाडले. रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल यांच्या पुनरागमनामुळे भारताची फळी मजबूत होईल असे वाटले होते, परंतु बांगलादेशच्या शाकिबने लैय भारी कामगिरी केली. रोहित शर्माचा आज चार अष्टपैलू खेळाडूंसह खेळण्याचा प्रयोग फसला, १९, ०, २, ० अशा धावा करून ते माघारी परतले. लोकेश राहुल ( KL Rahul) एकटा खिंड लढवत होता. शाकिबने १० षटकांत ३६ धावांत ५ विकेट्स घेतल्या.
रोहित व शिखर धवन ही नियमित जोडी सलामीला मैदानावर उतरली. सहाव्या षटकात भारताला पहिला धक्का बसला. धवन रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात ७ धावांवर त्रिफळाचीत झाला. रोहित व विराट कोहली यांनी चांगली खेळी केली होती, परंतु शाकिब अल हसनने एकाच षटकात दोघांना बाद केले. त्याने रोहितला ( २७) त्रिफळाचीत केले, तर तिसऱ्या चेंडूवर विराटचा ( ९) लिटन दासने अफलातून झेल घेतला. श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांची ५६ चेंडूंत ४३ धावांची भागीदारी इबादत होसैनने संपुष्टात आणली. श्रेयस २४ धावांवर झेलबाद झाला.
लोकेश संभाळून खेळत होता आणि यावेळेस त्याला वॉशिंग्टन सुंदरची चांगली साथ मिळाली. त्याने लोकेशसह पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. लोकेशनेही ४९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण, शाकिब अल हसन पुन्हा टीम इंडियाच्या आडवा आला अन् सुंदरला त्याने १९ धावांवर माघारी पाठवून लोकेशसह ६० धावांची भागीदारी संपुष्टात आणली. शाहबाद अहमद आला तसा गेला, शाकिबने अप्रतिम झेल टिपला. शाकिबने त्यानंतर दोन धक्के दिले. शार्दूल ठाकूर ( २) व दीपक चहर ( ०) यांना त्याने बाद करताना डावात पाच विकेट्स घेतल्या.
भारताची अवस्था ३४.४ षटकांत ८ बाद १५८ अशी झालीय आणि ते ५० षटकं तरी खेळून काढतील का अशी शंका निर्माण झालीय. १५२ वर चौथी विकेट पडली आणि त्यानंतर १५८ पर्यंत चार धक्के बसले. आता लोकेशकडे आक्रमक खेळ करून धावा वाढवण्यापलीकडे दुसरा पर्यात नव्हता. याच प्रयत्नात तो अनामुल हकच्या हाती झेल देऊन परतला. एबादत होसैनने ही विकेट घेतली. लोकेशने ७० चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ७३ धावा केल्या. शाकिबची ( ५-३६) कामगिरी ही भारताविरूद्ध वन डे क्रिकेटमधील डावखुऱ्या फिरकीपटूची सर्वोत्तम कामगिरी ठरली. इबादत होसैनने चौथी विकेट्स घेताना भारताचा डाव १८६ धावांवर गुंडाळला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs BAN 1st ODI Live Update : A solid knock from KL Rahul ends on 73 in 70 balls with 5 fours and 4 sixes, Five-wicket haul for Shakib Al Hasan, India fold out for 186.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.