बांगलादेश विरुद्धच्या ग्वाल्हेर टी-२० सामन्यात युवा सलामीवीर अभिषेक शर्मानं अनुभवी संजू सॅमसनच्या साथीनं टीम इंडियाच्या डावाला सुरुवात केली. अभिषेक शर्मानं अगदी आपल्या स्फोटक अंदाजात बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई करायला सुरुवातही केल्याचे पाहायला मिळाले. पण त्याची ही इनिंग फक्त ७ चेंडूची राहिली. २०० पेक्षा अधिक स्ट्राइक रेटनं धावा कुटणाऱ्या अभिषेक शर्मानं रन आउटच्या रुपात आपली विकेट गमावली. त्याने ७ चेंडूत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १६ धावा काढल्या. त्याची ही छोटीखानी खेळी २२८.५७ च्या स्ट्राइक रेटनं बहरली होती.
दुसऱ्या षटकात अभिषेकची तुफान फटकेबाजी, पण शेवटच्या चेंडूवर गडबड घोटाळा
भारतीय संघाच्या डावातील पहिल्या षटकात संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मानं १० धावा कुटल्या होत्या. यात संजूच्या खात्यात ९ धावा तर अभिषेकच्या खात्यात फक्त एक धाव होती. कारण पहिल्या षटकात अभिषेकच्या वाट्याला फक्त दोनच चेंडू आले होते. तस्कीन अहमद घेऊन आलेल्या भारताच्या डावातील दुसऱ्या षटकात अभिषेकनं आपली पॉवर दाखवली. बांगलादेशच्या गोलंदाजी ताफ्यातील या स्टार बॉलरचे स्वागत त्याने गगनचुंबी सिक्सरनं केले. त्यानंतर या षटकातील दुसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर त्याने खणखणीत चौकार मारला. पाचव्या चेंडूवर एक धाव काढत त्याने स्ट्राइक संजूला दिले. याच षटकातील शेवटच्या चेंडूवर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्यातील ताळमेळ ढासळला.
काय घडलं? कुणाची होती चूक?
संजू सॅमसन याने दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू हलक्या हाताने शॉर्ट मिडविकेटच्या दिशेनं खेळला. चेंडू सरळ क्षेत्रक्षणाच्या हातात गेला. यावेळी अभिषेकनं चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. संजू नो नो म्हणत होता पण अभिषेक खूपच पुढे निघून आला होता. एवढेच नाही तर तौहीद हृदोय (Towhid Hridoy) याने डायरेक्ट स्टम्पचा वेध घेतला. त्यामुळे अभिषेक शर्माचा खेळ इथंच खल्लास झाला. आता रन आउट झाल्यावर चूक कुणाची हा प्रश्न पडतोच. यात रन आउटमध्ये धाव होत नाही याचा कॉल संजूनं केला होता. पण तरीही अभिषेक खूप पुढे निघून आला. त्यामुळे यात चूक त्याचीच होती, असे स्पष्ट दिसून आले.
हीच जोडी पुन्हा करेल टीम इंडियाच्या डावाची सुरुवात
बांगलादेशच्या मालिकेआधीच कॅप्टन सूर्यकुमार यादव याने अभिषेक शर्मासोबत संजू सॅमसन डावाची सुरुवात करेल, ही गोष्ट स्पष्ट केली होती. संजूनं काही अप्रतिम स्ट्रोक खेळत आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला. त्याने १९ चेंडूत ६ चौकाराच्या मदतीने २९ धावांची खेळी केली. पुढच्या दोन सामन्यातही हीच जोडी भारताच्या डावाला सुरुवात करताना दिसू शकते. पहिल्या सामन्यातील गडबड घोटाळा विसरून नव्या जोमाने ते संघाला दमदार सुरुवात करून देतील हीच अपेक्षा.