India vs Bangladesh, 1st Test : भारताने पहिल्या डावातील २७४ धावसंख्येत २५८ धावांची अधिक भर घातली आणि बांगलादेशसमोर ५१३ धावांचे लक्ष्य ठेवले. बांगलादेशचे फलंदाज चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच गुडघे टेकतील असे वाटले होते. पण, २४ वर्षीय पदार्पणवीर जाकिर हसन भारतीय गोलंदाजांना भिडला. त्याने पदार्पणात शतक झळकावून टीम इंडियाचं टेंशन वाढवलं होतं, परंतु अक्षर पटेलने अखेरच्या काही षटकांत झटपट धक्के देत भारताला कमबॅक करून दिले.
मुश्फिकर रहिम आणि शाकिब अल हसन ही अनुभवी जोडी मैदानावर होती आणि रिषभ पंतने सोपा झेल सोडून रहिमला जीवदानही दिले होते. पण, अक्षरने २३ धावांवर रहीमचा त्रिफळा उडवला. त्यानंतर नुरूल हसन (३) याला रिषभने चपळाईने यष्टिचीत केले. बांगलादेशने चौथ्या दिवसअखेर ६ फलंदाज २७२ धावा केल्या. शाकिब व मेहिदी हसन मिराज यांनी दिवसअखेर खिंड लढवली आहे आणि आता त्यांना पाचव्या दिवशी विजयासाठी २४१ धावा करायच्या आहेत. भारताला विजयासाठी चार विकेट्स हव्या आहेत.
तत्पूर्वी, भारताच्या पहिल्या डावातील ४०४ धावांचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांवर भारताने गुंडाळला. कुलदीपने १६-६-४०-५ अशी कामगिरी केली. मोहम्मद सिराजने दोन विकेट्स घेतल्या, तर उमेश यादव व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. फॉलो ऑन न देता फलंदाजीचा सराव मिळावा या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या लोकेश राहुलला ( २३) पुन्हा अपयश आले. शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी ११३ धावांची भागीदारी केली. शुभमनने १५२ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ११० धावा केल्या. पुजारानेही १३० चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने नाबाद १०२ धावा केल्या. भारताने दुसरा डाव २ बाद २५८ धावांवर घोषित करताना बांगलादेशसमोर ५१३ धावांचे लक्ष्य ठेवले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"