Join us  

IND vs BAN 1st Test : आघाडीचे तिघे ढेपाळले; चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर अन् रिषभ पंतने सावरले! बांगलादेशला उत्तर दिले 

India vs Bangladesh, 1st Test : शुबमन गिल, लोकेश राहुल व विराट कोहली हे झटपट बाद झाल्याने टीम इंडियाची अवस्था  ३ बाद ४८ धावा अशी झाली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 4:15 PM

Open in App

India vs Bangladesh, 1st Test : शुबमन गिल, लोकेश राहुल व विराट कोहली हे झटपट बाद झाल्याने टीम इंडियाची अवस्था  ३ बाद ४८ धावा अशी झाली होती. पण,  रिषभ पंतने आक्रमक खेळी करून डाव सावरला. चेतेश्वर पुजाराची त्याला साथ मिळाली. रिषभ केवळ ४५ चेंडू खेळला, परंतु या खेळीत त्याने दोन मोठे विक्रम नोंदवले. अर्धशतकाने मात्र त्याला हुलकावणी दिली. पुजारा व श्रेयस अय्यर यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करताना १४९ धावांची विक्रमी भागीदारी केली. पुजाराचे शतक हुकले असले तरी त्याने दिलीप वेंगसरकर यांचा मोठा विक्रम मोडला. भारताने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी यजमान बांगलादेशला सडेतोड उत्तर दिले. 

कसला भारी चेंडू टाकला, विराट कोहलीला नाही समजला; बाद झाल्यावर गोलंदाजाकडे पाहत राहिला, Video 

शुबमन गिल ( २०) व लोकेश राहुल ( २२)  ही जोडी सलामीला आली आणि झटपट माघारीही परतली. विराट कोहली ( १) आज कसोटीतील शतकाचा दुष्काळ दूर करेल असे वाटले होते. पण, इस्लामच्या अप्रतिम वळणाऱ्या चेंडूवर विराट LBW झाला. बिनबाद ४१ वरून भारताची अवस्था ३ बाद ४८ अशी झाली. रिषभ पंतचेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला. रिषभने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४००० धावांचा टप्पाही ओलांडला. रिषभ व चेतेश्वर यांनी भारताला शतकी पार नेले. रिषभला त्याचा सूर गवसलेला दिसला आणि त्यानेही वन डे स्टाईल फटकेबाजी केली. पण, मेहिदी हसन मिराजने रिषभला ( ४६) माघारी जाण्यास भाग पाडले. रिषभच्या खेळीत ६ चौकार व २ षटकारांचा समावेश होता.   रिषभने आजच्या सामन्यात दोन खणखणीत षटकार मारून कसोटीत पन्नास सिक्सचा विक्रम नावावर केला. वीरेंद्र सेहवाग ( ९०), महेंद्रसिंग धोनी ( ७८), सचिन तेंडुलकर ( ६९),  रोहित शर्मा ( ६४), कपिल देव ( ६१), सौरव गांगुली ( ५७), रवींद्र जडेजा ( ५५) यांच्या पंक्तित रिषभने स्थान पटकावले, परंतु भारताकडून कसोटीत सर्वात जलद ५० सिक्स मारण्याचा विक्रम त्याने त्याच्या नावावर नोंदवला. रिषभनंतर भारताच्या डावाला आकार दिला तो पुजारा-अय्यर जोडीने. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकासह  पाचव्या विकेटसाठी १००+ धावा जोडल्या. पुजाराने ७८वी धाव पूर्ण करताच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांत आठवे स्थान पटकावले. त्याने दीलिप वेंगसरकरांचा विक्रम मोडला. सचिन तेंडुलकर ( १५९२१), राहुल द्रविड ( १३२६५), सुनील गावस्कर ( १०१२२), व्ही व्ही एस लक्ष्मण ( ८७८१), वीरेंद्र सेहवाग ( ८५०३), विराट कोहली ( ८०७५), सौरव गांगुली ( ७२१२), पुजारा (  ६८७०*) आणि वेंगसरकर ( ६८६८) असा क्रम येतो. पुजारा-श्रेयस यांच्या ३१७ चेंडूंत १४९ धावांच्या भागीदारीला तैजूल इस्लामची नजर लागली अन् पुजारा २०३ चेंडूंत ११ चौकारांसह ९० धावांवर बाद झाला. दिवसाच्या अखेरच्या षटकात अक्षर पटेल ( १३) LBW झाला अन् भारताच्या ६ बाद २७८ धावा झाल्या. ( India vs Bangladesh Live Scorecard ) श्रेयस ८२ धावांवर नाबाद आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशश्रेयस अय्यरचेतेश्वर पुजारारिषभ पंत
Open in App