Join us  

मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला

जड्डूनं १२४ चेंडूचा सामना करताना ११ चौकार अन् २ षटकारांच्या मदतीने ८६ धावांचे बहुमुल्य योगदान दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 10:26 AM

Open in App

 India vs Bangladesh, 1st Test, Day 2 : भारत- बांगलादेश यांच्यातील चेन्नई कसोटीतील दुसऱ्या दिवसाच्या खेळात रवींद्र जडेजाला आपल्या भात्यातून कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावण्याची संधी होती. पण तस्कीन अहमदनं दुसऱ्या दिवशीच्या खेळातील तिसऱ्याच षटकात जड्डूला तंबूत धाडलं. भारतीय संघाने पहिल्या दिवसाअखेर ६ बाद ३३९ धावा केल्या होत्या. अश्विन (१०२*)  आणि रवींद्र जडेजा (८६*) धावांवर खेळत होते. 

चेंडू मारू का सोडू या संभ्रमात फसला जड्डू; तस्कीनला मिळाली विकेट

पहिल्या दिवशी कमालीची खेळी करणारा रवींद्र जडेजाला दुसऱ्या दिवशी खात्यात एकही धाव जमा करता आली नाही. तस्कीन अहमद याचा चेंडू सोडू का मारू या संभ्रमात त्याने बॅट फिरवली अन् तो त्याच्या जाळ्यात अडकला. रवींद्र जडेजाचे शतक १४ धावांनी हुकले. जडेजाचे शतक हुकले असले तरी त्याने भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणणारी खेळी केली. जड्डूनं १२४ चेंडूचा सामना करताना ११ चौकार अन् २ षटकारांच्या मदतीने ८६ धावांचे बहुमुल्य योगदान दिले.

शतकासह द्विशतकी पार्टनरशिपचा डाव एका धावेनं हुकला

रवींद्र जडेजा आणि आर अश्विन दोघांनी मिळून चेन्नई कसोटीचा पहिला दिवस गाजवला. भारतीय संघाची अवस्था ६ बाद १४४ धावा अशी बिकट असताना ही जोडी जमली. सातव्या विकेटसाठी दोघांनी १९९ धावांची भागीदारी केली. द्विशतकी भागीदारी अवघ्या एका धावेनं हुकली. बांगलादेशकडून  हसन अलीनं सर्वोत्तम गोलंदाजी करताना चार विकेट्स घेतल्या. दुसऱ्या दिवशी तस्कीन याने गोलंदाजीची सूत्रे आपल्या हाती घेतल्याचे पाहायला मिळाले. त्याने जडेजासह आकाश दीपची विकेट घेत आपल्या खात्यात २ विकेट्स जमा केल्या.  याशिवाय नाहिद राणा आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.  

टॅग्स :रवींद्र जडेजाआर अश्विनभारतीय क्रिकेट संघबांगलादेशभारतीय क्रिकेट संघ