India vs Bangladesh, 1st Test : बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरचे ( Shreyas Iyer) शतक पाहायला मिळेल, अशी अपेक्षा फोल ठरली. सुरुवातीच्या षटकात अय्यरला पुन्हा जीवदान मिळाल्याने भारतीय चाहते आनंदी झाले खरे, परंतु इबादत होसैनने भारतीय फलंदाजाला शतकापासून वंचित ठेवले. होसैनच्या गोलंदाजीवर कालच श्रेयसची विकेट पडली असती, परंतु चेंडू व स्टम्प्सचा संपर्क होऊनही बेल्स न पडल्याने श्रेयस खेळपट्टीवर उभा राहिला. पण, आज होसैनने ती संधीच दिली नाही आणि अप्रतिम चेंडू टाकताना श्रेयसचा त्रिफळाच उडवला.
अय्यर झाला होता बाद पण...अय्यर ७८ धावांवर असताना इबादत होसैनच्या चेंडूने यष्टींचा वेध घेतला होता. चेंडू व यष्टी यांच्यात संपर्क झाला आणि बेल्सची लाईट पेटली. पण, बेल्स खाली न पडल्याने अय्यरला नाबाद दिले गेले. बांगलादेशचे खेळाडूही अचंबित झाले. यावरून आकाश चोप्राने लाईट पेटल्या तरीही आऊट दिले जावे अशी मागणी केली.
अय्यर ८२ धावांवर नाबाद खेळत होता आणि त्याला कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही जीवदान मिळाले. पण, इबादत होसैनने धैर्य सोडले नाही आणि त्याने अप्रतिम चेंडू टाकून श्रेयसचा ८६ धावांवर त्रिफळा उडवला. अय्यरने १९२ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने या धावा केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"