India vs Bangladesh, 1st Test : भारतीय संघाने पहिल्या कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. भारताने पहिल्या डावात ४०४ धावसंख्या उभी केली. त्यानंतर मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) व कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) यांनी बांगलादेशला धक्के दिले. कुलदीपने कसोटी कारकीर्दित तिसऱ्यांदा डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. अक्षर पटेलने शेवटची विकेट घेत बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांत गुंडाळला. २५४ धावांची आघाडी असताना भारताने फॉलो ऑन न देता पुन्हा फलंदाजीला येण्याचा निर्णय घेतला.
शुभमन गिलने आश्चर्यकारक कॅच घेतला अन् विराट कोहलीने भन्नाट सेलिब्रेशन केलं, Video
भारताच्या पहिल्या डावातील ४०४ धावांचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. मोहम्मद सिराजने सलामवीर नजमूल शांतोला यष्टिरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद केले. उमेश यादवने दुसरा धक्का देताना यासिर अलीचा ( ४) त्रिफळा उडवला. जाकीर हसन ( २०) व लिटन दास ( २४) यांनी बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु सिराजने त्यांचा डाव हाणून पाडला. कुलदीप यादवनेही पुनरागमनाच्या कसोटीत दमदार फलंदाजीपाठोपाठ गोलंदाजीतही कमाल केली. त्याने मुश्फीकर रहिम ( २८), कर्णधार शाकिब अल हसन ( ३) आणि नुरूल हसन ( १६) यांच्या विकेट्स घेत बांगलादेशला सातवा धक्का दिला. कुलदीपने १० षटकांत ३३ धावांत ४ विकेट्स घेतल्या. बांगलादेशने दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद १३३ धावा केल्या होत्या.
कुलदीपने तिसऱ्या दिवशी आणखी एक विकेट घेत डावातील पाच विकेट्स पूर्ण केल्या. इबादत होसैनच्या सुरेख झेल रिषभने टिपला. चट्टोग्राम येथे पाच विकेट्स घेणारा कुलदीप हा पहिला भारतीय ठरला. कुलदीपने १६-६-४०-५ अशी कामगिरी केली. मोहम्मद सिराजने दोन विकेट्स घेतल्या, तर उमेश यादव व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"