India vs Bangladesh, 1st Test : भारतीय संघाने पहिल्या कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. भारताने पहिल्या डावात ४०४ धावसंख्या उभी केली. त्यानंतर मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) व कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) यांनी बांगलादेशला धक्के दिले.
भारताच्या पहिल्या डावातील ४०४ धावांचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. मोहम्मद सिराजने सलामवीर नजमूल शांतोला यष्टिरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद केले. उमेश यादवने दुसरा धक्का देताना यासिर अलीचा ( ४) त्रिफळा उडवला. जाकीर हसन ( २०) व लिटन दास ( २४) यांनी बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु सिराजने त्यांचा डाव हाणून पाडला. कुलदीप यादवनेही पुनरागमनाच्या कसोटीत दमदार फलंदाजीपाठोपाठ गोलंदाजीतही कमाल केली. त्याने मुश्फीकर रहिम ( २८), कर्णधार शाकिब अल हसन ( ३) आणि नुरूल हसन ( १६) यांच्या विकेट्स घेत बांगलादेशला सातवा धक्का दिला. कुलदीपने १० षटकांत ३३ धावांत ४ विकेट्स घेतल्या. बांगलादेशने दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद १३३ धावा केल्या होत्या.
कुलदीपने तिसऱ्या दिवशी आणखी एक विकेट घेत डावातील पाच विकेट्स पूर्ण केल्या. इबादत होसैनच्या सुरेख झेल रिषभने टिपला. चट्टोग्राम येथे पाच विकेट्स घेणारा कुलदीप हा पहिला भारतीय ठरला.
गिलचा अफलातून झेल अन् विराट भारीच आनंदात... ३२ व्या षटकाच्या अखेरीस, बांगलादेशची धावसंख्या ५ बाद ९७ अशी होती. नुरुल हसन आणि मुशफिकुर रहीम हळूहळू स्थिरावले होते. डावखुरा चायनामन कुलदीपने ३३व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर एक लेन्थ बॉल टाकला, नुरुल हसन पुढे सरकत चेंडूला लेग साईडच्या दिशेने टोलावला. शुभमन गिल शॉर्ट लेगवर उभा होता आणि त्याने अफलातून झेल पकडला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"