IND vs BAN Live Match Updates । चेन्नई : पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी विजयाकडे कूच केली. चेन्नई येथे होत असलेला भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना नाना कारणांनी चर्चेत आहे. पहिल्या दिवशी आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या मोठ्या भागीदारीमुळे पाहुण्या बांगलादेशची पळता भुई थोडी झाली. टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावात ३७६ धावा केल्या. मग फलंदाजीला आलेल्या बांगलादेशला चांगलाच संघर्ष करावा लागला. जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांनी सुरुवातीपासूनच दबाव टाकला. बांगलादेशचा संघ अवघ्या १४९ धावांत गारद झाला अन् भारताला २२७ धावांची आघाडी मिळाली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार बळी घेतले, तर मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.
खरे तर बांगलादेशच्या डावादरम्यान एक नाट्यमय घडामोड घडली. झाले असे की भारतीय कर्णधार रोहित शर्माला मोहम्मद सिराजची माफी मागावी लागली. भारताकडून सिराज चौथे षटक टाकत होता. या षटकात बांगलादेशचा सलामीवीर झाकिर हसन बाद होण्यापासून थोडक्यात वाचला. त्याच्या पॅडला चेंडू लागल्याने भारतीय शिलेदारांनी जोरदार अपील केली. मात्र, पंचांनी प्रतिसाद न दिल्याने झाकीरला सुखद धक्का बसला. पण, मोहम्मद सिराज तिसऱ्या पंचांची मदत घेऊ इच्छित होता. मात्र रोहित शर्माने रिषभ पंतशी चर्चा केल्यानंतर रिव्ह्यू न घेण्याचा निर्णय घेतला.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पाहायला मिळते की, रोहित शर्मा चेंडू पॅडच्या वरती लागला असल्याचे सांगत आहे. पण, रिप्ले पाहिला असता चेंडू स्टम्पच्या दिशेने कूच करत असल्याचे दिसते. एकूणच यावेळी रोहितने सिराजचे ऐकून रिव्ह्यू घेतला असता तर झाकीरला बाहेरचा रस्ता धरावा लागला असता. जेव्हा रिव्ह्यूमध्ये फलंदाज बाद असल्याचे दिसते तेव्हा रोहितने स्मित केले. त्यानंतर सिराजच्या गोलंदाजीला दाद देताना त्याची पाठ थोपाटली. याशिवाय रिषभ पंतने हातवारे करत आपल्या चुकीची कबुली दिली.