Join us  

IND vs BAN 1st Test Live: 'टीम इंडिया'च्या फिरकीपुढे बांगलादेशी टायगर्स 'क्लीन बोल्ड', भारताचा १८८ धावांनी विजय

अक्षर पटेल, कुलदीप यादव जोडीने बांगलादेशी फलंदाजांना पळता भुई थोडी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 9:59 AM

Open in App

Ind vs Ban 1st Test Live Updates Axar Patel Kuldeep Yadav: वन डे मालिका गमावलेल्या भारतीय संघाने कसोटी मालिकेचा श्रीगणेशा विजयाने केला. यजमान बांगलादेशला त्यांच्याच भूमीत भारताने तब्बल १८८ धावांनी पराभूत केले आणि २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० असा विजय मिळवला. या विजयात भारतीय संघाचे फिरकीपटू महत्त्वाचे ठरले. पाचव्या दिवसापर्यंत रंगलेल्या या सामन्यात दुसऱ्या डावात अक्षर पटेलने ४ तर कुलदीप यादवने ३ बळी घेत भारताला विजय मिळवून दिला.

अक्षर-कुलदीपचा जलवा!

पाचव्या आणि शेवटच्या दिवशी शाकीब अल हसनकडून संघर्ष केला जाईल याची भारतीयांना कल्पना होती. तसेच घडले. मेहिदी हसन मिराज १३ धावांवर बाद झाला पण शाकीबने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने तब्बल ६ षटकार आणि तितकेच चौकार लगावत १०८ चेंडूत ८६ धावा कुटल्या. कुलदीप यादवने त्याला बाद केल्यानंतर भारताने सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर ताजीउल इस्लाम (४) आणि इबादन हुसेन (०) यांना माघारी घालवत भारताने पहिल्या कसोटीवर १८८ धावांनी कब्जा केला.

त्याआधी, भारतीय संघाने पहिल्या डावात चांगली आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात २ बाद २५८ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर बांगलादेशी फलंदाज झटपट बाद होतील अशी भारतीय खेळाडूंना अपेक्षा होती. पण ५०० पेक्षा जास्त धावांचे आव्हान मिळूनही ते डगमगले नाही. बांगलादेशच्या सलामीवीरांनी झुंजा खेळ दाखवला. नाजीउल शांतोने अर्धशतक ठोकले. तर झाकीर हसनने शतकी खेळी केली. या दोघांच्या भागीदारीमुळे बांगलादेश ही कसोटी अनिर्णित ठेवण्यात यशस्वी होणार की काय अशी शक्यता होती. पण अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या फिरकी जोडीने भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. यासिर अली (५), लिटन दास (१९), मुश्फीकूर रहीम (२३) आणि नुरूल हसन (३) यांना झटपट माघारी धाडून भारताने चौथ्या दिवशी बांगलादेशला एकूण सहा धक्के दिले.

पहिल्या तीन डावांत काय घडलं?

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुल याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा (९०) आणि श्रेयस अय्यर (८६) यांनी शतकानजीक जाणारी खेळी केली. पण दोघांचेही शतक हुकले. आर अश्विनने अर्धशतक ठोकले. याशिवाय, रिषभ पंत (४६) आणि कुलदीप यादवने (४०) दमदार खेळी केली. बांगलादेशने प्रत्युत्तरात पहिल्या डावात नांगी टाकली.  कुलदीप यादवचे ५ बळी आणि मोहम्मद सिराजचे ३ बळी यांच्या बळावर भारताने बांगलादेशला १५० धावांतच गुंडाळले.

त्यानंतर भारताने फॉलो-ऑन न देता फलंदाजी करायची ठरवली. भारताकडून दुसऱ्या डावात शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा हे दोन तारे चमकले. शुबमन गिलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलेच शतक ठोकले. त्याने १० चौकार आणि ३ षटकारांसह ११० धावा केल्या. तर चेतेश्वर पुजाराने वेगवान खेळी केली. त्याने १३ चौकारांच्या साथीने  नाबाद १०२ धावा केल्या. भारताने बांगलादेशला ५०० धावांपेक्षा मोठे आव्हान दिले. पण बांगलादेशला ते आव्हान पेलले नाही. त्यांचा दुसरा डाव ३२४ धावांवर आटोपला.  

 

 

 

 

 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशकुलदीप यादवअक्षर पटेलचेतेश्वर पुजारा
Open in App