Team India Batting, IND vs BAN 1st Test: पाकिस्तानला पराभूत करून आलेल्या बांगलादेशच्या संघाने टीम इंडियाविरूद्ध तोच फॉर्म पहिल्या दोन सत्रात कायम ठेवला. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतल्यानंतर बांगलादेशी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची चांगलीच तारांबळ उडवली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल वगळता वरच्या फळीतील इतर सर्व फलंदाजांनी भारतीयांची घोर निराशा केली. रोहित, विराट, गिल आणि पंत चौघांना हसन मेहमूदने माघारी धाडले. जैस्वालने अर्धशतक केले पण नाहिद राणाने त्याला लगेच बाद केले. पाठोपाठ केएल राहुलदेखील स्वस्तात बाद झाला. भारतीय फलंदाजांच्या वाईट कामगिरीवर नेटकरी चांगलेच संतापले. त्यातही एका फलंदाजाच्या खराब बॅटिंगवर सोशल मीडियावर नाराजी पाहायला मिळाली.
टीम इंडियाच्या वरच्या फळीतील फलंदाजांची फळी पूर्णपणे अपयशी ठरली. निम्मा संघ बाद झाला तेव्हा केएल राहुल मैदानात होता. त्याच्या अनुभवाचा उपयोग संघाला होईल अशी भारतीयांची अपेक्षा होती. पहिले पाच फलंदाज वेगवान गोलंदाजीपुढे बाद झाले होते. राहुलने मात्र स्पिनर मेहदी हसन मिराजला विकेट दिली. फॉरवर्ड शॉर्टलेग वरील फिल्डरने त्याला अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर राहुलच्या खराब कामगिरीवरून त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आली.
एकाने लिहिले की, मी तुझ्यापुढे हात जोडतो, सगळ्यांना हात जोडायला सांगतो पण एकदा तरी मोठी खेळी कर. दुसऱ्याने युजरने लिहीले की, कधीपासून राहुलला बॉल वाया घालवायला आवडतात, त्याला तिसऱ्या नंबरला खेळवा. राहुलचा फॉर्म इतका वाईट होतोय की त्याची बॅटिंगची सरासरी त्याच्या वयापेक्षा कमी होणार आहे. एका युजरने तर थेट आकडेवारी दिली आहे. राहुलने २०१४ मध्ये कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून ८७ डावांत फक्त ३३.८७च्या सरासरीने धावा केल्या आहेत. राहुलच्या खराब कामगिरीवर सोशल मीडियावर खूपच टीका पाहायला मिळत आहे.
----
----
भारतीय फलंदाजीची सुरूवात अतिशय खराब झाली. रोहित शर्मा ६ धावांवर, शुबमन गिल शून्यावर तर विराट कोहलीही ६ धावांवर माघारी परतला. त्यामुळे संघाची अवस्था ३ बाद ३४ होती. मग रिषभ पंतने यशस्वी जैस्वालला साथ दिली. या दोघांनी ६२ धावांची भागीदारी केली. दुसऱ्या सत्रात रिषभ पंत ३९ धावांवर, यशस्वी जैस्वाल ५६ धावांवर बाद झाला. निम्मा संघ तंबूत परल्यानंतर केएल राहुलनेही निराशाच केली. १६ धावा काढून तो स्पिनरला विकेट देऊन बसला. त्यामुळे दुसऱ्या सत्राअखेर भारताची अवस्था ६ बाद १४४ झाली होती. तिसऱ्या सत्रात रवींद्र जाडेजा आणि रवीचंद्रन अश्विन या दोन अष्टपैलू फलंदाजांनी भारताच्या डावाला आकार त्रिशतकी मजल मारून दिली.