IND vs BAN 1st Test Match Live Updates | चेन्नई : भारताने बांगलादेशला नमवून विजयी सलामी दिली. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर अश्विनने आपल्या घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध बॉल आणि बॅट दोन्ही बाजूंनी मोर्चा सांभाळत चमकदार कामगिरी केली. प्रथम त्याने फलंदाजी करताना शतक केले आणि नंतर गोलंदाजी करताना एकाच डावात सहा बळी घेतले. टीम इंडियाने आपले वर्चस्व कायम राखत बांगलादेशला पराभवाची धूळ चारली. सलामीच्या कसोटी सामन्यातील चारही दिवस यजमान भारताचा दबदबा पाहायला मिळाला. अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांनी अष्टपैलू खेळी करत आपल्या संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
पहिल्या डावात भारत अडचणीत असताना अश्विनने शतक तर जड्डूने शानदार अर्धशतक झळकावले. त्यानंतर गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने कमाल केली. खरे तर बांगलादेशने आपल्या पहिल्या डावात अवघ्या १४९ धावा केल्याने भारताला मजबूत आघाडी मिळाली. त्यामुळे बांगलादेशसमोर विजयासाठी ५१५ धावांचे विशाल लक्ष्य होते. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सलामीचा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर झाला. अखेर भारताने तब्बल २८० धावा विजय साकारला.
अश्विनची मिश्किल प्रतिक्रियासामन्यानंतर बोलत असताना हर्षा भोगले यांनी अश्विनला सांगितले की, मी ऐकले आहे की लोक त्यांच्या वाढदिवसाला इतरांना चांगल्या भेटवस्तू देतात. तू तुला स्वत: ला ही भेट दिली हे चांगले आहे. यावर उत्तर देताना अश्विन मिश्किलपणे म्हणाला की, मला कोणीही गिफ्ट दिले नाही, त्यामुळे मी स्वतःला गिफ्ट देण्याचा विचार केला.
या सामन्यात फलंदाजी करताना भारताच्या पहिल्या डावात अश्विनने १३३ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ११३ धावा केल्या. टीम इंडियाचे बहुतांश प्रमुख फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले असताना अश्विनच्या बॅटमधून ही खेळी आली. त्याला रवींद्र जडेजाने चांगली साथ दिली. अश्विन आणि जडेजाने भारताचा डाव सांभाळला आणि चांगली धावसंख्या गाठण्यात मदत केली. त्यानंतर सामन्याच्या शेवटच्या डावात गोलंदाजी करताना अश्विनने ६ बळी घेतले.