IND vs BAN 1st Test Match Live Updates | चेन्नई : टीम इंडियाने आपले वर्चस्व कायम राखत बांगलादेशला पराभवाची धूळ चारली. सलामीच्या कसोटी सामन्यातील चारही दिवस यजमान भारताचा दबदबा पाहायला मिळाला. अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांनी अष्टपैलू खेळी करत आपल्या संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. पहिल्या डावात भारत अडचणीत असताना अश्विनने शतक तर जड्डूने शानदार अर्धशतक झळकावले. त्यानंतर गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने कमाल केली. खरे तर बांगलादेशने आपल्या पहिल्या डावात अवघ्या १४९ धावा केल्याने भारताला मजबूत आघाडी मिळाली. त्यामुळे बांगलादेशसमोर विजयासाठी ५१५ धावांचे विशाल लक्ष्य होते. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सलामीचा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर झाला. अखेर भारताने तब्बल २८० धावा विजय साकारला.
भारताचा पहिला डाव
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. पण, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी डाव सावरला. अश्विनने (११३) शतकी खेळी केली तर जड्डूने (८६) धावांचे योगदान दिले. याशिवाय सलामीवीर यशस्वी जैस्वालने (५६) धावा कुटल्या. भारत आपल्या पहिल्या डावात ३७८ धावा करू शकला. बांगलादेशकडून हसन महमूदने सर्वाधिक (५) बळी घेतले, तर तस्कीन अहमद (३) आणि नाहिद राणा आणि मेहदी हसन यांनी १-१ बळी घेतला.
बांगलादेशचा पहिला डाव
बांगलादेशला आपल्या पहिल्या डावात काहीच खास करता आले नाही. जसप्रीत बुमराहच्या घातक गोलंदाजीसमोर कोणत्याच बांगलादेशच्या फलंदाजाचा टिकाव लागला नाही. अखेर ते १४९ धावांत सर्वबाद झाले. भारताकडून बुमराहने सर्वाधिक चार बळी घेतले, तर मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.
भारताचा दुसरा डाव
प्रतिस्पर्धी बांगलादेशचा संघ स्वस्तात बाद झाल्याने दुसऱ्या डावात भारताला मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती. या डावात रिषभ पंत आणि शुबमन गिल यांनी शतकी खेळी केली. या जोरावर भारताने ४ बाद २८७ धावसंख्या असताना डाव घोषित केला. मिळालेल्या आघाडीमुळे भारताने बांगलादेशसमोर ५१५ धावांचे मोठे आव्हान ठेवले.
बांगलादेशचा दुसरा डाव
५१५ धावांच्या विशाल आव्हानापर्यंत पोहोचण्यासाठी बांगलादेशला एका चमत्काराची गरज होती. पण, आर अश्विन असताना चमत्कार होईल तो कसा... तिसऱ्या दिवसअखेर बांगलादेशने साजेशी कामगिरी केली होती. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला शाकिब अल हसन आणि कर्णधार नजमुल शांतो यांनी डाव सावरला. पण, आर अश्विन पुन्हा एकदा त्यांच्यासाठी काळ ठरला. त्याने शाकिबला बाद करताच जड्डूने लिटन दास आणि पुढच्या फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. या डावात अश्विनने सर्वाधिक सहा बळी घेतले, तर जडेजाला (३) आणि बुमराहला एक बळी घेता आला. बांगलादेश २३४ धावांत गारद झाल्याने भारताने २८० धावांनी मोठा विजय मिळवला.
Web Title: IND vs BAN 1st Test Match Live Updates team india beat Bangladesh by 281 runs r Ashwin, the hero with a century and a fifer
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.