Join us  

IND vs BAN, 1st Test : शुभमन, चेतेश्वर यांच्या शतकाने टीम इंडियाचे विजयाच्या दिशेने पाऊल; बांगलादेश दोन दिवस टिकणे अवघड! 

India vs Bangladesh, 1st Test : भारतीय संघाने पहिल्या कसोटीत विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 4:14 PM

Open in App

India vs Bangladesh, 1st Test : भारतीय संघाने पहिल्या कसोटीत विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. पहिल्या डावातील ४०४ धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांत गुंडाळला. दुसऱ्या डावात शुभमन गिलचेतेश्वर पुजारा या जोडीने बांगलादेशच्या नाकी नऊ आणले. गिलने कसोटीतील पहिले शतक झळकावले, तर पुजाराने सातत्यपूर्ण खेळ करताना शतकी खेळी केली. भारताने २ बाद २५८ धावांवर दुसरा डाव घोषित करताना बांगलादेशसमोर विजयासाठी ५१३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

 शुभमन गिलच्या विकेटसाठी DRS; तिसऱ्या अम्पायरच्या उत्तराने बांगलादेशी खेळाडू उडाले 

भारताच्या पहिल्या डावातील ४०४ धावांचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांवर भारताने गुंडाळला. मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) व कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) यांनी बांगलादेशला धक्के दिले. कुलदीपने कसोटी कारकीर्दित तिसऱ्यांदा डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. अक्षर पटेलने शेवटची विकेट घेतली.  कुलदीपने १६-६-४०-५ अशी कामगिरी केली. मोहम्मद सिराजने दोन विकेट्स घेतल्या, तर उमेश यादव व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. 

फॉलो ऑन न देता फलंदाजीचा सराव मिळावा या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या लोकेश राहुलला ( २३) पुन्हा अपयश आले. शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी ११३ धावांची भागीदारी केली. शुभमनने मिळालेल्या संधीवर सोनं करताना कसोटीतील पहिले शतकही पूर्ण केले. १५२ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह गिलने ११०  धावा केल्या. बांगलादेशविरुद्ध कसोटीत शतक झळकावणारा गिल हा सातवा भारतीय सलमीवीर ठरला. यापूर्वी  गौतम गंभीर, वासिम जाफर, दिनेश कार्तिक, शिखर धवन,  मुरली विजय, मयांक अग्रवाल यांनी हा पराक्रम केला आहे.     ( India vs Bangladesh Live Scorecard )

पुजारानेही धावांची गती वाढवली आणि कसोटीतील त्याचे सर्वात जलद शतक झळकावले. भारताने दुसरा डाव २ बाद २५८ धावांवर घोषित करताना बांगलादेशसमोर ५१३ धावांचे लक्ष्य ठेवले. पुजारने १३० चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने नाबाद १०२ धावा केल्या. १४४३ दिवसानंतर त्याने तिहेरी आकडा गाठला आणि त्याचे हे १९वे कसोटी शतक ठरले. तिसऱ्या दिवसअखेर बांगलादेशने बिनबाद ४१ धावा केल्या आहेत आणि त्यांना विजयासाठी पुढील दोन दिवसांत ४७२ धावा कराव्या लागणार आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशशुभमन गिलचेतेश्वर पुजारा
Open in App