India vs Bangladesh, 1st Test : वन डे मालिकेतील अपयश विसरून भारतीय संघ नव्या उम्मेदीनं कसोटी मालिकेत मैदानावर उतरला आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करतोय आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. भारतीय संघ आज तीन फरकी गोलंदाजांसह मैदानावर उतरला आहे. लोकेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारत-बांगलादेश यांच्यात आतापर्यंत ११ कसोटी सामने झाले आणि त्यात भारताने ९ विजय व २ ड्रॉ निकाल लावले. बांगलादेशला एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही, परंतु यजमानांचा सध्याचा फॉर्म हा टीम इंडियाची डोकेदुखी वाढवणार आहे.
मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा यांच्यानंतर रोहितने घेतलेली माघार ही भारतासाठी चिंतेची बाब होती. त्यात काल सराव सत्रात शुबमन गिलला झालेल्या दुखापतीने त्यात भर पडली होती. अभिमन्यू ईश्वरनला संधी मिळण्याची शक्यता होती, परंतु तसे काहीच झाले नाही. १२ वर्षांनंतर कसोटी संघात निवड झालेला जयदेव उनाडकत हा व्हिसा न मिळाल्यामुळे भारतातच राहिला आणि त्याला पहिल्या कसोटीला मुकावे लागले. भारतीय संघ तीन फिरकीपटू, दोन जलदगती गोलंदाज व सहा फलंदाजासह आज मैदानावर उतरला आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या फायनलसाठी काय करावं लागेल?
- WTC तालिकेत भारतीय संघ सध्या चौथ्या क्रमांकावर आहे
- भारताला WTC सर्कलमध्ये एकूण सहा ( २ वि. बांगलादेश आणि ४ वि. ऑस्ट्रेलिया) कसोटी सामने खेळायचे आहेत
- सहा पैकी पाच कसोटी सामने जिंकून भारत WTC फायनलमध्ये स्थान पक्कं करू शकतो
- भारताने सहापैकी सहा सामने जिंकले तर त्यांची विजयाची टक्केवारी ६८.०६ होईल आणि त्यांचे स्थान पक्कं होईल
- सहापैकी ५-१ असा विजय मिळवला तर भारताची टक्केवारी ६२.५ इतकी होईल आणि दुसऱ्या स्थानासह ते फायनलला पोहोचतील. सध्या दुसऱ्या क्रमांकावर असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ बाहेर जाईल
- पण, सहापैकी २ कसोटी गमावल्यास भारताचे कसोटी वर्ल्ड कप फायनलला जाणे अशक्य होऊन बसेल.
- ऑस्ट्रेलिया ७५ टक्क्यांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिका ( ६० टक्के), श्रीलंका ( ५३.३३ टक्के), भारत ( ५२.०८ टक्के) आणि इंग्लंड ( ४४.४४ टक्के) असा क्रम येतो.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"