पाकिस्तानचा दारूण पराभव केल्यानंतर यजमान भारतीय संघ गुरूवारी विश्वचषकातील आपला चौथा सामना बांगलादेशविरूद्ध खेळेल. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात विजयाचा चौकार लगावण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असेल. बांगलादेशच्या संघाने विजयाचे खाते उघडले असले तरी त्यांना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा पराभव करून विजयाची हॅटट्रिक लगावली आहे. दरम्यान, मागील वर्षींच्या ट्वेंटी-२० विश्वचषकादरम्यान आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीची आणखी एक पोस्ट व्हायरल होत आहे.
बांगलादेश भारतीय संघाचा पराभव करून पाकिस्तानचा बदला घेईल असे सेहर शिनवारीने म्हटले. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले, "बांगलादेशचा संघ नक्कीच भारताचा पराभव करून आमच्या पराभवाचा बदला घेईल. जर असे झाल्यास मी ढाक्याला (बांगलादेशची राजधानी) जाईन आणि बंगाली खेळाडूंसोबत फिश डिनर डेट करेन. पण, त्यासाठी त्यांनी भारताचा पराभव केला पाहिजे."
रोहितसेनेच्या विजयाची हॅटट्रिक शेजाऱ्यांचा मोठा पराभव करून भारताने चालू विश्वचषकात विजयाची हॅटट्रिक लगावली. पाकिस्तानी संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ४२.५ षटकांत सर्वबाद केवळ १९१ धावा केल्या. पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने भारताविरूद्ध अर्धशतकी खेळी केली पण संघाला विजय मिळवून देण्यात त्याला अपयश आले. पाकिस्तानने दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरूवात केली. विश्वचषकात पदार्पण करत असलेल्या शुबमन गिलने काही चांगले फटकार मारले पण त्याला शाहीन आफ्रिदीने जास्त वेळ टिकू दिले नाही. मग कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारून ६३ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. याशिवाय श्रेयस अय्यरने नाबाद ५३ धावा करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.