India vs Bangladesh 2nd ODI Live Updates : बांगलादेशच्या डावातील दुसऱ्याच षटकात स्लीपमध्ये कॅच घेण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) बोटाला दुखापत झाली. त्याने तातडीने मैदान सोडलं अन् स्कॅनसाठी हॉस्पिटल गाठलं. काही वेळानंतर तो ड्रेसिंग रुममध्ये परतला तो डाव्या बोटाला पट्टी बांधून... आता रोहित या सामन्यात काही खेळत नाही असे दिसत असताना रोहित ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला अन् भारतीयांना धीर मिळाला. पण, तळाच्या फलंदाजांकडून फार साथ न मिळाल्याने रोहितचा संघर्ष अयशस्वी ठरला. रोहितने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, पण शेवटच्या चेंडूवरील फटका हुकला अन् ५ धावांनी बांगलादेशने हा सामना जिंकला. विजयासह बांगलादेशने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. २०१५नंतर त्यांनी पुन्हा वन डे मालिका जिंकली.
धाडसी कॅप्टन! संघ अडचणीत असताना जखमी रोहित शर्मा बोटाला पट्टी बांधून मैदानावर उतरला
२७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट ( ५), धवन ( ८) व वॉशिंग्टन सुंदर ( ११) माघारी परतल्याने भारताची अवस्था ३ बाद ३९ अशी झाली. लोकेश राहुल व श्रेयस अय्यर पुन्हा एकदा भारताचा डाव सावरतील असे वाटले होते, परंतु लोकेश १४ धावांवर LBW झाला. त्याने अक्षर पटेलसह पाचव्या विकेटसाठी शतकी धावा जोडल्या. श्रेयस- अक्षरची १०७ धावांची भागीदारी मेहिदी हसनने तोडली. १०२ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ८२ धाव करणाऱ्या श्रेयसचा आफिफ होसैनने अप्रतिम झेल टिपला. बांगलादेशने गोलंदाजीत बदल केला आणि इबादत होसैनने भारताचा सेट फलंदाज अक्षरला ( ५६) बाद केले.
भारताचे ६ फलंदाज १८९ धावांवर माघारी परतले होते आणि विजयासाठी त्यांना ११.४ षटकांत ८३ धावा करायच्या होत्या. दीपक चहर फलंदाजीला आला, सोबत शार्दूल ठाकूर होता. शार्दूल ७ धावांवर बाद झाला आणि भारताला विजयासाठी ४२ चेंडूंत ६४ धावा करायच्या होत्या. अशात रोहित मैदानावर आला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. बांगलादेशचे चाहते मात्र टेंशनमध्ये आले. बोट दुखत असूनही रोहितने ४६व्या षटकात इबादतला ६,६,४ असे धुतले.
४९व्या षटकात रोहितचे दोन झेल सोडले आणि बांगलादेशचे चाहते भडकले. अखेरच्या चेंडूवर मोहम्मद सिराजला ( २) बाद करून बांगलादेशने भारताचे टेंशन वाढवले. भारताला ६ चेंडूंत २० धावा करायच्या होत्या. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर रोहितने सलग दोन चौकार खेचले. त्यानंतर एक चेंडू निर्धाव गेल्यानंतर खणखणीत षटकार खेचून रोहितने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. एक चेंडूंत ६ धावा हव्या असताना रोहितचा फटका चूकला अन् बांगलादेशने ५ धावांनी सामना जिंकला. रोहितने २८ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ५१ धावा केल्या. भारताला ९ बाद २६६ धावाच करता आल्या.
तत्पूर्वी, मोहम्मद सिराज, उम्रान मलिक व वॉशिंग्टन सुंदर यांनी बांगलादेशची अवस्था दयनीय केली होती. अनामुल हक ( ११), लिटन दास ( ७), नजमूल शांतो ( २१), शाकिब अल हसन ( ८ ), मुश्फीकर रहिम ( १२) व आफिफ होसैन ( ०) हे सहा फलंदाज अवघ्या ६९ धावांवर माघारी परतले. दुसऱ्याच षटकात रोहित शर्माला स्लीपमध्ये झेल घेताना डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले. मेहिदी हसन मिराज याने पुन्हा एकदा भारताची डोकेदुखी वाढवली आणि यावेळेस त्याला महमुदुल्लाहच्या अनुभवाची साथ मिळाली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी १४८ धावा जोडल्या. महमुदुल्लाह ९६ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ७७ धावांवर तंबूत परतला. मेहिदी व नसून अहमद यांनी २२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. मेहिदीने ८३ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकार खेचून नाबाद १०० धावा केल्या. बांगलादेशने ७ बाद २७१ धावा केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"