India vs Bangladesh 2nd ODI Live Updates : बांगलादेश दौऱ्यावर जाणे भारताला चांगलेच महागात पडलेले दिसतेय... वन डे मालिकेला सुरूवात होण्यापूर्वीच दुखापतीचे ग्रहण भारताच्या मानगुटीवर बसले आणि त्यात पहिल्या सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. त्यात दुसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) च्या बोटाला दुखापत झाली आणि तो मालिकेलाच मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोलंदाज दीपक चहर याच्याही मांडीचे स्नायू ताणले गेले आहेत, तोही डग आऊटमध्ये जाऊन बसलाय. मेहिदी हसन मिराज व महमदुल्लाह या बांगलादेशी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. ६ बाद ६९ धावांवरून त्यांनी संघाला २७० पार नेले...
मोहम्मद सिराज, उम्रान मलिक व वॉशिंग्टन सुंदर यांनी बांगलादेशची अवस्था दयनीय केली होती. अनामुल हक ( ११), लिटन दास ( ७), नजमूल शांतो ( २१), शाकिब अल हसन ( ८ ), मुश्फीकर रहिम ( १२) व आफिफ होसैन ( ०) हे सहा फलंदाज अवघ्या ६९ धावांवर माघारी परतले. दुसऱ्याच षटकात रोहित शर्माला स्लीपमध्ये झेल घेताना डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले. तो आजची मॅच खेळण्याची शक्यता कमीच आहे. पहिल्या सामन्यातील नायक मेहिदी हसन मिराज याने पुन्हा एकदा भारताची डोकेदुखी वाढवली आणि यावेळेस त्याला महमुदुल्लाहच्या अनुभवाची साथ मिळाली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी १००+ धावा जोडल्या.
रोहित शर्मा बोटाला पट्टी बांधून ड्रेसिंग रुममध्ये दिसला आणि त्यात दीपक चहरच्या मांडीचे स्नायू ताणले गेले. तो डग आऊटमध्ये जाऊन बसला आहे. त्याने केवळ ३ षटकं फेकली आहेत आणि तो नसल्याचा फायदा बांगलादेशला झाला. उम्रान मलिकने अखेर ही भागीदारी तोडली. हसन व महमुदुल्लाह यांनी सातव्या विकेटसाठी विक्रमी १६५ चेंडूंत १४८ धावांची विक्रमी भागीदारी केली. महमुदुल्लाह ९६ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ७७ धावांवर तंबूत परतला. लोकेश राहुलने अफलातून झेल घेतला. पण, या विकेटनंतरही बांगलादेशच्या धावांचा वेग कमी झाला नाही आणि मेहिदीने ४६-४७व्या षटकांत २८ धावा कुटल्या.
उम्रान मलिकच्या गोलंदाजीत अनुभवाची उणीव जाणवली आणि त्याचा मेहिदीने फायदा उचलला. अखेरच्या १० षटकांत बांगलादेशने जवळपास १०च्या सरासरीने धावा कुटल्या. मेहिदी व नसून अहमद यांनी २२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. मेहिदीने अखेरच्या षटकांत १५ धावा करून वन डेतील पहिले शतक पूर्ण केले. त्याने ८३ चेंडूंत शतक पूर्ण करताना बांगलादेशला ७ बाद २७१ धावांचा डोंगर उभारून दिला. त्याने ८ चौकार व ४ षटकार खेचून नाबाद १०० धावा केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs BAN 2nd ODI Live : Sensational Hundred for Mehidy Hasan Miraz in just 83 balls. He has taken Bangladesh from 69-6 to 271-7
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.