Rohit Sharma, IND vs BAN 2nd ODI: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. हा सामना मीरपूरमध्ये खेळवला जात आहे. हा सामना महत्त्वाचा आहे हे दोन्ही संघांना माहिती आहे. त्यामुळे संघातही काही बदल करण्यात आले आहेत. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारतीय संघात २ बदल करण्यात आले आहेत. त्यापैकी एक शाहबाज अहमदच्या जागी अक्षर पटेलच्या पुनरागमन झाले. त्याबद्दल कोणाचीही तक्रार नाही. त्याचवेळी दुसऱ्या बदलावर मात्र प्रश्न निर्माण झाले आहेत. हा प्रश्न माजी भारतीय कर्णधाराने विचारला आहे.
नक्की बदल काय?
टीम इंडियातील दुसरा बदल म्हणजे संघातून वेगवान गोलंदाज कुलदीप सेनला डच्चू देण्यात आला असून त्याच्या जागी उमरान मलिकचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. कुलदीप सेनला वगळण्याचे कारण कर्णधार रोहित शर्माने टॉसनंतर सांगितले की तो या सामन्यासाठी उपलब्ध नाही. पण मीरपूरच्या मैदानावर उपस्थित भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्रा हिला हे कारण पटलेले नाही.
संघात असंच सुरू राहिलं तर...
नाणेफेकीनंतर अंजुम चोप्रा ब्रॉडकास्ट चॅनलवर आली आणि तिने याकडे लक्ष वेधले. ती म्हणाली की ती दावा करू शकत नाही पण तिने पाहिलेल्या चित्रांनुसार कुलदीप सेनचा दुखापत किंवा फिटनेसशी काही संबंध आहे असे तिला वाटत नाही. क्रिकेट सामन्याच्या प्री-शोमध्ये अजय जाडेजाच्या प्रश्नांना उत्तर देताना तिने कुलदीप सेनला रनअप घेताना आणि सराव करताना पाहिल्याचे सांगितले. आणि ती छायाचित्रे पाहिल्यानंतर कुलदीप सेनचा फिटनेसशी संबंध आहे असे तिला वाटत नसल्याचेही स्पष्ट केले. तसेच, टीम इंडियामध्ये संगीत खुर्ची सुरू आहे. असाच प्रकार सुरू राहिला तर कोणताच खेळाडू आपली सर्वोत्तम कामगिरी करू शकणार नाही, असे तिने कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाला सुनावलं.
कुलदीप सेनबद्दल बीसीसीआयकडून अपडेट
तथापि, नंतर बीसीसीआयने कुलदीप सेनच्या दुखापतीबद्दल ट्विट करून अपडेट दिली आणि लिहिले की त्याला पाठीचा त्रास आहे. वैद्यकीय पथकाच्या सल्ल्याने तो विश्रांती घेत आहे.