Hardik Pandya catch, IND vs BAN 2nd T20: कसोटी मालिकेपाठोपाठ भारतीय संघाने बांगलादेश विरूद्ध टी२० मालिकेतही अजिंक्य आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना नितीश कुमार रेड्डीच्या ७४ धावांच्या जोरावर २२१ धावा केल्या. या आव्हानाचा पाठवलाग करताना गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेशचा संघ २० षटकांत ९ बाद १३५ धावाच करू शकला. भारताकडून वरूण चक्रवर्ती आणि नितीश कुमार रेड्डीने २-२ बळी घेतले. बांगलादेशने आपल्या डावात एकूण ९ गडी गमावले, पण त्यातील हार्दिक पांड्याने रिशाद होसेनला बाद करण्यासाठी घेतलेला झेल भाव खाऊन गेला.
बांगलादेशच्या फलंदाजीच्या वेळी वरूण चक्रवर्ती १४वे षटक टाकत होता. १४व्या षटकातील तिसरा चेंडूत वरूण चक्रवर्तीने टाकला. बांगलादेशचा संघ ६ बाद ९३ धावांवर असताना रिशाद होसेन फलंदाजी करत होता. ९ चेंडूत ९ धावा करुन तो खेळत होता. वरुणने गोलंदाजी केली. रिशादने चेंडू हवेत मारला. हार्दिक पांड्या चेंडूच्या रेषेपासून खूपच लांब होता. पण हार्दिक तुफान वेगाने सीमारेषेच्या आतून धावला, त्याने चेंडू झेलला आणि तो जमिनीवर पडला तरीही त्याने झेल सोडला नाही. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, भारतीय संघाने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दोनही सलामीवीर स्वस्तात गमावले. संजू सॅमसन (१०) आणि अभिषेक शर्मा (१५) बाद झाल्यावर सूर्यादेखील (८) बाद झाला. मग नितीश कुमार रेड्डी (७४) आणि रिंकू सिंग (५३) या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने द्विशतकी मजल मारली. पुढे हार्दिक पांड्याने १९ चेंडूत ३२ धावा करत संघाला २० षटकात २२१ धावांची मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करत असताना बांगलादेशच्या फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. भारताकडून नितीश कुमार रेड्डीने अष्टपैलू कामगिरी करत दोन विकेट्सही घेतल्या. तर वरुण चक्रवर्तीनेही २ बळी घेतले. अखेर बांगलादेशला २० षटकांत केवळ १३५ धावांपर्यंतच मजल मारता आली आणि भारताने सामन्यासह मालिकाही जिंकली.