IND vs BAN 2nd Test: भारताने पहिला कसोटी सामना १८८ धावांनी जिंकला. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), शुबमन गिल (Shubman Gill) यांची शतके, श्रेयस अय्यर, अश्विन यांची अर्धशतके आणि कुलदीप यादवची (Kuldeep Yadav) अष्टपैलू कामगिरी याच्या जोरावर भारताने बांगलादेशचा दणकून पराभव केला. हा सामना जिंकून टीम इंडियाने (Team India) मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 22 डिसेंबरपासून ढाका येथे खेळवला जाणार आहे. बांगलादेश (Bangladesh) क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मालिका वाचवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात बांगलादेशने दोन स्टार खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
कोण बाहेर, कोणाला संधी?
बांगलादेशने डावखुरा फिरकी गोलंदाज नसुम अहमदचा (Nasum Ahmed) संघात समावेश केला आहे. नसूमने अद्याप कसोटीमध्ये पदार्पण केलेले नाही. नसूमला संघात स्थान देण्यामागे शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) हे सर्वात मोठे कारण आहे. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर बांगलादेशचे प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांनी सांगितले होते की, दुसऱ्या कसोटीत शकीब अल हसनची गोलंदाजी निश्चित नाही. भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत शाकिबला दुखापतही झाली होती. त्यामुळेच पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने केवळ ११ षटके टाकली होती. दुसऱ्या डावात त्याने गोलंदाजी केली नाही. पण फलंदाजीत त्याने तुफानी ८६ धावांची खेळी केली. त्यामुळे शाकीबला संघात कायम ठेवून नसूमला संधी मिळाल्यास बांगलादेशकडे दुसऱ्या फिरकीपटूचा पर्याय उपलब्ध होईल.
बांगलादेशसाठी मोठी अडचण म्हणजे त्यांचा स्टार गोलंदाज इबादत हुसेन (Ebadot Hossain) दुसऱ्या कसोटीत सहभागी होणार नाहीये. इबादतला पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) महत्त्वाची विकेट मिळाली. त्याने भारतीय फलंदाजांना खूप त्रास दिला. पण त्याच्या पाठीला दुखापत झाल्याने तो संघाबाहेर आहे. त्याच वेळी, शरीफुल इस्लामलाही हाताच्या दुखापतीमुळे बाहेर आहे. आतापर्यंत अनामूल हकला या संघात स्थान मिळालेले नाही. पण यावेळी त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
बांगलादेशचा संपूर्ण १५ खेळाडूंचा संघ- महमुदुल हसन जॉय, नजमुल शांतो, मोमिनुल हक, यासिर अली, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन (कर्णधार), लिटन दास, नुरुल हसन, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, तस्किन अहमद, खालेद अहमद, झाकीर हसन आणि रेझाउर रहमान राजा