कोलकाता : भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशीच बांगलादेशवर आघाडी मिळवली आहे. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या डे नाइट सामन्याची साऱ्यांना उत्सुकता होती. बांगलादेशचा पहिला डाव १०६ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीचे नाबाद अर्धशतक आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकाच्या जोरावर ४ बाद १७४ अशी मजल मारली आहे. त्यामुळे भारताकडे पहिल्या दिवशीच ६८ धावांची आघाडी आहे.
ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा १०६ धावांत खुर्दा उडवल्याचे पाहायला मिळाले. भारताकडून इशांत शर्माने सर्वाधिक पाच बळी मिळाले, त्याचबरोबर उमेश यादवने तीन आणि मोहम्मद शमीने दोन बळी मिळवले.
बांगलादेशच्या १०६ धावांचा पाठलाग करताना भारताच्या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली होती. पण मयांक अगरवाल आणि रोहित शर्मा या दोघांनाही मोठी खेळी साकारता आली नाही. पण त्यानंतर पुजारा आणि कोहली यांनी संघाचा डाव सावरला. पुजाराने आठ चौकारांसह ५५ धावांची खेळी साकारली आणि तो बाद झाला. पण कोहलीने मात्र दिवस अखेरपर्यंत खिंड लढवली. कोहलीने आठ चौकारांच्या जोरावर नाबाद ५९ धावांची खेळी साकारली. कोहलीबरोबर खेळ संपेपर्यंत अजिंक्य रहाणे (नाबाद २३) खेळत होता.
ऐतिहासिक सामन्यात इशांत शर्माने रचला इतिहास; पाच विक्रमांना गवसणी
इडन गार्डन्स येथे सुरु असलेल्या ऐतिहासिक सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने इतिहास रचल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात इशांतने चक्क पाच विक्रमांना गवसणी घातली आहे.
आजचा दिवस इशांतसाठी खास होता. कारण बांगलादेशच्या पाच फलंदाजांना बाद करत इशांतने मोठी जबाबदारी पेलली. बांगलादेशचा अर्धा संघ इशांतने गारद केला आणि त्यामुळेच भारताला बांगलादेशला १०६ धावांमध्ये गुंडाळता आले.
इशांतने या सामन्यात नेमके केले तरी काय, यावर आपण एक नजर टाकू या... बांगलादेशने नाणेफक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारताकडून पहिला चेंडू टाकण्याचा मान इशांतला मिळाला. त्याचबरोबर पहिले निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रमही इशांतने केला. त्याचबरोबर भारतातील पहिल्या डे नाइट कसोटी सामन्यात भारताकडून पहिला बळी मिळवण्याची किमयाही इशांतने साधली. एका डावात सर्वात लवकर पाच विकेट्स मिळवण्याचा विक्रमही यावेळी इशांतनेआपल्या नावावर केला, त्याचबरोबर भारताच्या पहिल्या डे नाइट कसोटी सामन्यात पहिल्यांदा पाच विकेट्स मिळवण्याचा मान इशांतने पटकावला आहे.
ऐतिहासिक सामन्यात इशांत शर्माने रचला विक्रम
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये पहिल्या डे नाइट कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने एक विक्रम रचल्याचे पाहायला मिळाले आहे.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत उपहारापर्यंत बांगलादेशच्या सहा फलंदाजांना ७३ धावांत गुंडाळल्याचे पाहायला मिळाले होते.
भारताच्या गोलंदाजांनी गुलाबी चेंडूच्या मदतीने अचूक आणि भेदक मारा करत बांगलादेशच्या फलंदाजांची फे फे उडवल्याचे पाहायला मिळाले. इशांत शर्माने या सामन्यात एक इतिहास रचल्याचे पाहायला मिळाले.
भारताला पहिल्या सहा षटकांमध्ये एकही यश मिळाले नव्हते. पण इशांतने सातव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बांगलादेशच्या इम्रुल कायेसला पायचीत पकडले आणि इतिहास रचला गेला. भारताकडून गुलाबी चेंडूने खेळताना पहिला बळी मिळवण्याचा मान इशांतला मिळाला आणि इतिहास रचला गेला.
Web Title: Ind vs Ban, 2nd Test: India took lead on Bangladesh in first day of day night test match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.