India vs Bangladesh, 2nd Test : रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीत खेळणार असल्याची चर्चा होती, परंतु दुखापत पूर्णपणे बरी न झाल्याने त्याने मालिकेतूनच माघार घेतली. सोबत नवदीप सैनी यालाही दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीपूर्वी माघार घ्यावी लागली. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळणारी प्लेइंग इलेव्हनच २२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत कायम राहील अशी शक्यता होती. पण, त्यातही विघ्न आले आहे. रोहितच्या अनुपस्थितीत कर्णधारपद भूषविणाऱ्या लोकेश राहुलला ( KL Rahul Injury) सराव करताना हाताला चेंडू लागला. त्यामुळे आता उद्याच्या लढतीत तो खेळणार की नाही अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
२९ चेंडूंत १२२ धावांचा पाऊस! अजिंक्य रहाणेचं खणखणीत द्विशतक अन् मुंबईच्या पाचशेपार धावा
लोकेश राहुलचा फॉर्म सध्या चांगला सुरू नसला तरी सलामीला शुबमन गिलसोबत तो परफेक्ट चॉईस आहे. दुसऱ्या कसोटीच्या तयारीसाठी त्याने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत नेट्समध्ये बराच सराव केला. द्रविडने त्याला मार्गदर्शन केले. पण, सामन्याच्या पूर्वसंख्येला लोकेशला दुखापत झाली अन् टीम इंडियाची चिंता वाढली आहे. भारताचे फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी लोकेशची दुखापत गंभीर नसल्याचे संकेत दिले, परंतु तो उद्या खेळणार की नाही याबाबत त्यांनी कोणतेच विधान केलेले नाही.
''लोकेशची दुखापत गंभीर नाही. तो ठिक आहे. आशा करतो की तो पूर्णपणे बरा असेल. डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत, परंतु तो बरा असेल अशी आशा आहे,''असे राठोड म्हणाले. थ्रो डाऊन स्पेशालिस्टने टाकलेल्या चेंडूवर लोकेशला ही दुखापत झाली. त्याच्या हातावर चेंडू जोराने आदळला अन् लोकेशने तेव्हाच सराव थांबवला. ज्या भागावर चेंडू लागला तो भाग तो जोराने चोळत होता आणि डॉक्टरांनी त्याच्याकडे त्वरीत धाव घेतली.
रोहितच्या अनुपस्थितीत लोकेश कर्णधारपदाच्या भूमिकेत आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या वन डे सामन्यात विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटीसाठी लोकेश पूर्णपणे तंदुरुस्त न झाल्यास उप कर्णधार चेतेश्वर पुजारा नेतृत्व करताना दिसेल आणि लोकेशच्या जागी अभिमन्य ईश्वरन हा सलामीला खेळेल. अभिमन्यूने भारत अ संघासोबतच्या बांगलादेश अ संघाविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळेच रोहितच्या जागी त्याची संघात निवड केली गेली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"