IND vs BAN 2nd Test Match Live Updates | कानपूर : आजपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी काही हिंदू संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. बांगालादेशात हिंदूवर होत असलेल्या अन्यायाचा दाखला देत हिंदू महासभेने बांगलादेशविरुद्ध क्रिकेट खेळण्यास विरोध दर्शवला होता. आता सामन्याच्या पहिल्याच दिवशी बांगलादेशच्या चाहत्याला कानपूर येथे भारतीय चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर ही लढत पार पडत आहे.
भारतीय चाहत्यांनी केलेल्या मारहाणीमुळे बांगलादेशच्या एका चाहत्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. बांगलादेशच्या या चाहत्याने वाघाचे चित्र असलेला नेहमीचा पोशाख परिधान केला होता. हल्ला होण्यापूर्वी त्याने बांगलादेशचा झेंडा फडकावला होता. माहितीनुसार, हल्ला करणाऱ्यांनी हल्ला करण्यापूर्वी त्याच्या हातातून बांगलादेशचा ध्वज हिसकावून घेतला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. बांगलादेशच्या चाहत्याला दुखापत झाल्यानंतर पोलीस आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेले. बांगलादेशचा सुपर फॅन म्हणून प्रसिद्ध असेलल्या टायगर रॉबीला मारहाण करण्यात आली.
भारताचा संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, रिषभ पंत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
बांगलादेशचा संघ - नजमुल हुसैन शान्तो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमीनुल हक, मुशफिकर रहिम, शाकिब अल हसन, लिटन दास (यष्टिरक्षक), मेंहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खलेद अहमद.