R Ashwin, IND vs BAN 2nd Test: बांगलादेशचा संघ पाकिस्तानविरूद्धची कसोटी मालिका जिंकून भारतात आला. भारतात त्यांची तशीच कामगिरी दिसेल अशी चाहत्यांना आशा होती. पहिल्या दिवसाची सुरुवात त्याप्रकारे झालीही होती. पण भारताचा अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विन बांगलादेशच्या विजयाच्या आड आला. त्याने संपूर्ण सामनाच पालटून टाकला. अश्विनचे शतक, जाडेजाची त्याला मिळालेली साथ आणि त्यानंतर फिरलेला सामन्याचा निकाल यामुळे अश्विनची खूप स्तुती झाली. अश्विन सध्या ३८ वर्षांचा आहे. तो लवकरच निवृत्त होईल अशी चर्चाही सुरू होती, पण त्याच्या खेळीने साऱ्यांनाच अवाक् केले. त्याच्या या कामगिरीनंतर इंग्लंडचा माजी फिरकीपटू माँटी पानेसार ( Monty Panesar ) याने एक महत्त्वाचे विधान केले.
"इंग्लंडचा क्रिकेट संघ आणि व्यवस्थापन बरेच प्रयोग करत असतात. ते खूप काळ एकाच खेळाडूला संधी देत नाहीत. अश्विन जर इंग्लंडचा खेळाडू असता तर आतापर्यंत त्याला निवृत्ती घ्यायला लावली असती. कारण इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनाची विचार करायची पद्धत खूपच वेगळी आहे. त्यांना जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संधी द्यायची असते. नव्या दमाच्या प्रतिभावान खेळाडूंना संघात स्थान देणे हा त्यांचा उद्देश असतो. इंग्लंडमध्ये संघाच्या कॉम्बिनेशनबाबत खूप प्रयोग केले जातात आणि त्यांना तेच आवडते," असे माँटी पानेसार म्हणाला.