Rohit Sharma Sachin Tendulkar IND vs BAN 2nd Test Day 4 Live Updates: बांगलादेश विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर भारतीय संघाने अफलातून खेळ केला. पहिल्या तीन दिवसांत फारच थोडा खेळ झाल्यानंतर आज चौथ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे चौथ्या दिवशीचा पूर्ण खेळ झाला. ३ बाद १०७ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात करणाऱ्या बांगलादेशच्या संघाचा पहिला डाव २३३ धावांत आटोपला. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी अक्षरश: टी२० सामन्यासारखी फलंदाजी केली. टीम इंडियाच्या फलंदाजांनी ३४.४ षटकांमध्ये ९ बाद २८५ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने २६ धावांत २ गडी गमावले. भारताच्या डावात कर्णधार रोहित शर्माने तुफान फटकेबाजी करत थेट मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या एका कामगिरीशी बरोबरी साधली.
कर्णधार रोहित शर्माने ११ चेंडूमध्ये २३ धावांची छोटेखानी खेळी केली. पण विशेष बाब म्हणजे या डावात त्याने जी खेळी केली, त्यात त्याने सचिनच्या एका विक्रमाची बरोबरी केली. रोहित शर्माने आज आपल्या डावाची सुरुवात सलग दोन चेंडूत दोन षटकार मारून केली. भारतीय संघाकडून खेळताना आपल्या डावाच्या पहिल्या दोन चेंडूत दोन षटकार मारण्याची किमया केवळ दोन फलंदाजांनी केली होती. त्यापैकी एक म्हणजे सचिन तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे वेगवान गोलंदाज उमेश यादव. सचिनने २०१३ साली ऑस्ट्रेलिया विरूद्ध हा पराक्रम केला होता. तर उमेश यादवनेही २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच हा कारनाम केल होता. आज त्यात रोहित शर्माची भर पडली.
दरम्यान, आजच्या दिवसाच्या खेळात मोमीनुल हकच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशने सर्वबाद २३३ धावा केल्या. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच फटकेबाजी केली. सलामीवीर यशस्वी जैस्वालने ७२ (५१), केएल राहुल ६८ (४३), विराट कोहली ४७ (३५) आणि रिषभ पंत ३९ (३६) या चौघांच्या दणकेबाज खेळींच्या जोरावर भारताने ३४.४ षटकात ९ बाद २८५ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर पुन्हा फलंदाजीसाठी उतरलेल्या बांगलादेशचा सलामीवीर झाकीर हसन १० (१५) धावांवर तर हसन मेहमूद ४ (९) धावांवर माघारी गेला. त्यामुळे आता शेवटच्या दिवशी काय घडते याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.