Join us  

IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल

ind vs ban test series : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 6:31 PM

Open in App

IND vs BAN 2nd Test Match : सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवून भारतीय संघाने विजयी सलामी दिली. आता दुसरा सामना २७ सप्टेंबरपासून कानपूर येथे खेळवला जाणार आहे. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये तब्बल ३ वर्षांनंतर कसोटी क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. मात्र, काही संघटनांच्या विरोधामुळे पोलिसांनी इथे अधिक कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. सुरक्षा व्यवस्थेसाठी कानपूर पोलिसांनी कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी मोठी कारवाई केली असून २० जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. स्टेडियम रोडसमोर हवन करणाऱ्या अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांविरोधात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पीटीआयने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार डीसीपी श्रवण कुमार यांनी सांगितले की, ग्रीन पार्क स्टेडियम आणि दोन्ही संघांच्या हॉटेलच्या जागा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये विभागल्या गेल्या आहेत. एवढेच नाही तर या संपूर्ण प्रकरणात डीसीपी, अतिरिक्त डीसीपी आणि एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांवर सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय कसोटी सामना यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कानपूर पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे, जे सामन्यादरम्यान तैनात केले जातील.

२७ तारखेला दुसरा कसोटी सामना खरे तर बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू महासभेनेही आवाज उठवला आहे. महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयवीर भारद्वाज म्हणाले की, बांगलादेशात अजूनही हिंदूंवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे सध्या या देशासोबत क्रिकेट खेळण्याची योग्य वेळ नाही. अशा परिस्थितीत हिंदू महासभेने सामन्याच्या दिवशी ग्वाल्हेर बंदची हाक दिली आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पद सोडण्यापूर्वीपासूनच बांगलादेशात अशांतता माजली आहे. याच कारणामुळे हसीना पंतप्रधानपद सोडून भारतात आल्या. तेव्हापासून बांगलादेशात अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात आहे. अनेक ठिकाणी हिंदूंवर हल्ले झाले आहेत. 

दरम्यान, कानपूरमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यादरम्यान आंदोलन करण्याचा इशाराही हिंदू महासभेने दिला होता. मात्र, चेन्नईतील पहिला कसोटी सामना कोणत्याही अडचणीशिवाय पार पडला. यामध्ये भारताने २८० धावांनी विजय मिळवत दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरी कसोटी २७ सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे. यानंतर तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका होणार आहे. ग्वाल्हेरमधील पहिल्या सामन्यानंतर शेवटचे दोन ट्वेंटी-२० सामने ९ ऑक्टोबरला दिल्ली आणि १२ ऑक्टोबरला हैदराबादमध्ये होतील.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशऑफ द फिल्ड