Virat Kohli's welcome at the team's hotel in Kanpur : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला २७ तारखेपासून सुरुवात होत आहे. यासाठी टीम इंडियाचे शिलेदार कानपूर येथे दाखल झाले आहेत. येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर मोठ्या कालावधीनंतर कसोटी सामना पार पडत आहे. भारतीय संघ इथे दाखल होताच त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. पण, यावेळी विराट कोहलीचा काही प्रमाणात संताप पाहायला मिळाला. स्वागतावेळी विराटने संतप्त प्रतिक्रिया दिल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. विराटच्या हातात टॅब आणि फोन होता... जेव्हा स्वागतावेळी त्याला पुष्पगुच्छ देण्यात आला तेव्हाच एका व्यक्तीने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. पण, विराटचा एकही हात मोकळा नसल्याने त्याने 'मला फक्त दोनच हात आहेत' असे सांगितले.
विराट कोहलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विराटनंतर रिषभ पंतचे स्वागत करण्यात आले. पंत आणि भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर कानपूर विमानतळावर एकत्र स्पॉट झाले, तर कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल एकत्र दिसले. टीम इंडियाने पहिला सामना जिंकून विजयी सलामी दिली. पहिल्या सामन्यात भारताकडून आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत आणि शुबमन गिल यांनी चमकदार कामगिरी केली.
दरम्यान, चेन्नईतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने २८० धावांनी विजय मिळवत दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरी कसोटी २७ सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे. यानंतर तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका होणार आहे. ग्वाल्हेरमधील पहिल्या सामन्यानंतर शेवटचे दोन ट्वेंटी-२० सामने ९ ऑक्टोबरला दिल्ली आणि १२ ऑक्टोबरला हैदराबादमध्ये होतील.