India vs Bangladesh, 2nd Test : रोहित शर्माला ( Rohit Sharma) २२ डिसेंबरपासून मीरपूर येथे सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे. चट्टोग्राममधील पहिल्या कसोटीला मुकलेला भारतीय कर्णधार आता ढाका येथे जाणार नाही. भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि शेवटच्या कसोटीत त्याच्या अनुपस्थितीत उपकर्णधार लोकेश राहुल संघाचे नेतृत्व करेल.
बांगलादेश दौऱ्यातील दुसऱ्या वन डे सामन्यादरम्यान दुखापत झालेला रोहितचा अंगठा पूर्ण बरा झालेला नाही आणि त्यामुळे सोमवारी रोहितच्या अनुपलब्धतेचे वृत्त समोर आले. त्याचा अंगठा अजूनही दुखत आहे. भारतीय संघासमोरली पुढील आव्हानं लक्षात घेता बीसीसीआय, निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने या टप्प्यावर रोहितबाबत धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. असे वृत्त इंग्रंजी वेबसाईटने दिले आहे BCCI ने या संदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही.
रोहित सध्या मुंबईत आहे आणि त्याला कसोटीत फलंदाजी करता आली असती, पण क्षेत्ररक्षण करताना जोखमीची चिंता कायम होती. त्याच्या अंगठ्याला पुन्हा दुखापत झाल्यास ते गंभीर ठरू शकते, असे वैद्यकीय संघ आणि संघ व्यवस्थापनाला वाटत होते. श्रीलंकेविरुद्ध ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या मालिकेसाठी (तीन ट्वेंटी-२० आणि तीन वन डे सामने) तो उपलब्ध असेल अशी शक्यता आहे.
भारताचा कसोटी संघ- लोकेश राहुल (कर्णधार), शुबमन गिल, अभिमन्यू ईश्वरन, चेतेश्वर पुजारा ( उप कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, सौरभ कुमार, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमेश यादव, नवदीप सैनी.
भारत-श्रीलंका मालिका
पहिली ट्वेंटी-२० - ३ जानेवारी, मुंबईदुसरी ट्वेंटी-२० - ५ जानेवारी, पुणेतिसरी ट्वेंटी-२० - ७ जानेवारी, राजकोट
पहिली वन डे - १० जानेवारी, गुवाहाटीदुसरी वन डे - १२ जानेवारी, कोलकातातिसरी वन डे - १५ जानेवारी, तिरुअनंतपुरम
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"