भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सुरू असलेला दुसरा कसोटी सामना रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. बांगलादेशने दिलेल्या १४५ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. कर्णधार लोकेश राहुल (२), चेतेश्वर पुजारा (६), शुभमन गिल (७) आणि विराट कोहली (१) हे झटपट बाद झाल्याने भारताची अवस्था बिकट झाली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने ४ बाद ४५ धावांपर्यंत मजल मारली आहे. मात्र तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी विराट कोहली आणि बांग्लादेशमधील एका खेळाडूचा वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी विराट कोहलीची विकेट पडली तेव्हा मैदानावर जोरदार भांडण झाले. बाद झाल्यानंतर विराट कोहली बांगलादेशी खेळाडूशी भिडला. त्यामुळे शकिब अल हसनला बचावासाठी यावे लागले. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात विराट कोहली केवळ १ धाव काढून बाद झाला. मोमिनुल हसनने मेहदी हसन मिराजच्या चेंडूवर विराट कोहलीचा झेल टिपला. विराट कोहली आऊट झाल्यावर बांग्लादेशी खेळाडूंनी जल्लोष साजरा केला. यादरम्यान बांगलादेशी खेळाडू आणि विराट कोहली यांच्यात काही वाद झाला.
तत्पूर्वी, बंगलादेशचा दुसरा डाव २३१ धावांत गुंडाळल्यानंतर १४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार लोकेश राहुल केवळ २ धावा काढून शाकिब अल हसनची शिकार झाला. तर मेहदी हसन मिराजने चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल आणि विराट कोहलीची विकेट काढत भारताला अडचणीत आणले. चौथ्या दिवस अखेर भारताने ४ बाद ४५ धावांपर्यंत मजल मारली आहे. अक्षर पटेल (२६) आणि जयदेव उनाडकट (३) खेळपट्टीवर आहेत. आता सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी १०० धावांची गरज असून, भारताच्या हातात ६ विकेट्स आहेत.
दरम्यान, बांगलादेशचा दुसरा डाव २३१ धावांवर आटोपला. कालच्या बिनबाद ७ धावांवरून पुढे खेळणाऱ्या बांगलादेशची तिसऱ्या दिवशी चांगली सुरुवात झाली नाही. सलामीवीर नजमुल हुसेन शंतो (५) आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला मोमिनूल हक (५) झटपट बाद झाले. त्यानंतर शकिब अल हसन (१३), मुशफिकूर रहिम (०) हेही बाद झाल्याने बांगलादेशची अवस्था ४ बाद ७० अशी झाली. यादरम्यान, झाकीर हसनने आपले अर्धशतक पूर्ण केलं. मात्र त्यानंतर झाकीर हसन ५१ धावा काढून बाद झाला. त्यानंतर बांगलादेशच्या डावाला पुन्हा गळती लागली. मेहदी हसन मिराज (०) आणि नुरूल हसन (३१) ठराविक अंतराने बाद झाल्याने बांगलादेशची अवस्था ७ बाद १५९ असी झाली. मात्र एक बाजू लावून धरणाऱ्या लिटन दासने तळाच्या फलंदाजांसोबत चिवट फलंदाजी करत बांगलादेशला दोनशेपार पोहोचवले. लिटन दासने ७३ धावांची खेळी केली. अखेरीस बांगलादेशचा दुसरा डाव २३१ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून अक्षर पटेलने ३ तर मोहम्मद सिराज आणि अश्विनने प्रत्येकी दोन तर उमेश यादव आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.