मीरपूर - भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याला जबरदस्त कलाटणी मिळाली आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पहिले पावणे तीन दिवस सामन्यावर संपूर्णपणे नियंत्रण ठेवणाऱ्या भारतीय संघाचे तिसऱ्या दिवसातील अखेरच्या दीड तासांमध्ये सामन्यावरील नियंत्रण सुटल्याचे चिन्ह दिसत आहे. तसेच १४५ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करता ४० धावांच्या आतच चार फलंदाज माघारी परतल्याने भारतीय संघासमोर पराभवाचं संकट उभं ठाकलं आहे.
खरंतर बांगलादेशचा दुसरा डाव आटोपला तेव्हा भारतीय संघाचं सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण होतं. तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यावर भारताच्या गोलंदाजांनी एकापाठोपाठ एक धक्के देत बांगलादेशच्या डावाला सुरुंग लावले. सुरुवातीला ४ बाद ७० आणि नंतर ७ बाद १५९ अशी अवस्था यजमान संघाची झाली होती. मात्र अखेरच्या टप्प्यात लिटन दासने केलेल्या अर्थशतकी खेळीमुळे बांगलादेशने समाधानकारक धावसंख्या ओलांडली.
मात्र बांगलादेशच्या संघाने सामन्याला खरी कलाटणी दिली ती शेवटच्या दीड तासामध्ये. माफक आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाकडून दिवसाच्या शेवटच्या सत्रात सावध फलंदाजीची अपेक्षा होती. मात्र टीम इंडियातील आघाडीच्या खेळाडूंनी निराशा केली. त्यातच शाकिब अल हसन आणि मेहदी हसनने परिस्थितीचा फायदा उचलत टिच्चून मारा केला. भारतीय फलंदाजांकडून चुका होत गेल्या आणि त्या बांगलादेशच्या पथ्थ्यावर पडल्या.
सलामीवीर लोकेश राहुल केवळ २ धावा काढून शाकिब अल हसनची शिकार झाला. त्यानंतर अक्षर पटेल नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीस आला. त्याने एक बाजू लावून धरली. मात्र दुसरीकडून भारताचे इतर आघाडीचे फलंदाज धडाधड बाद झाले. मेहदी हसन मिराजने चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल आणि विराट कोहलीची विकेट काढली. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला.तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट खेळपट्टीवर होते. आता ही जोडी चौथ्या दिवशी खेळपट्टीवर किती तग धरते यावर भारतीय संघाचे भवितव्य अवलंबून असेल.