अगदी रोमहर्षक झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ३ विकेट्स राखून थरारक विजय मिळवला. १४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ७ बाद ७४ अशी अवस्था झाली असताना श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन यांनी आठव्या विकेटसाठी अभेद्य ७१ धावांची भागीदारी करत भारताला रोमांचक विजय मिळवून दिला. मात्र या सामन्यासह मालिकेवर टीम इंडियाने कब्जा केला असला तरी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने दोन घोडचुका केल्या. त्यामुळे भारतीय संघ जवळपास पराभवाच्या खाईत लोटला गेलाच होता. पण रविचंद्रन अश्विनच्या खेळीमुळे भारतीय संघाला कसाबसा विजय मिळाला. या सामन्यामध्ये भारतीय संघाने केलेल्या चुका पुढीलप्रमाणे.
१ - भारतीय संघव्यवस्थापनाने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघामध्ये एक बदल केला. डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवला या सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले नाही. हा निर्णय प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार लोकेश राहुलने मिळून घेतला असावा. हा निर्णय भारतीय संघाला महागात पडला असता. भारताच्या एकूण १७ विकेट्सपैकी १६ विकेट बांगलादेशी फिरकीपटूंनी चटकावले होते. मात्र भारताच्या दोन्ही फिरकीपटूंना मिळून केवळ ९ विकेट मिळवता आल्या.
२ - बांगलादेशच्या संघाने दुसऱ्या डावात २३१ धावांपर्यंत मजल मारली. त्यामध्ये भारतीय संघाच्या सुमार क्षेत्ररक्षणाचा मोठा वाटा होता. एकट्या विराट कोहलीनेच चार झेल सोडले. भारताच्या क्षेत्ररक्षकांनी सुमार क्षेत्ररक्षण केलं नसतं तर कदाचित बांगलादेश २०० धावांपर्यंतही पोहोचला नसता. तसेच माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची झालेली दमछाक पाहता खराब क्षेत्ररक्षणही भारतीय संघाला महागात पडले असते. अखेर रविचंद्रन अश्विनने केलेल्या जिगरबाज खेळीमुळे भारतीय संघाला निसटता विजय मिळाला. अश्विनने ६२ चेंडूत ४२ धावांची खेळी केला. त्याने श्रेयस अय्यरच्या साथीने ७१ धावांची अभेद्य भागीदारी केली. भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या अश्विनने सामनावीराचा मान पटकावला.