मिरपूर - पहिल्या डावात ८७ धावांनी पिछाडीवर पडलेल्या बांगलादेशचा दुसरा डाव २३१ धावांत आटोपला. त्यामुळे दुसऱ्या कसोटीसह मालिका खिशात घालण्यासाठी भारतासमोर १४५ धावांचे आव्हान आहे. बांगलादेशकडून लिटन दास ७३ आणि झाकीर हसनने ५१ धावांची खेळी केली.
कालच्या बिनबाद ७ धावांवरून पुढे खेळणाऱ्या बांगलादेशची तिसऱ्या दिवशी चांगली सुरुवात झाली नाही. सलामीवीर नजमुल हुसेन शंतो (५) आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला मोमिनूल हक (५) झटपट बाद झाले. त्यानंतर शकिब अल हसन (१३), मुशफिकूर रहिम (०) हेही बाद झाल्याने बांगलादेशची अवस्था ४ बाद ७० अशी झाली. यादरम्यान, झाकीर हसनने आपले अर्धशतक पूर्ण केलं. मात्र त्यानंतर झाकीर हसन ५१ धावा काढून बाद झाला. त्यानंतर बांगलादेशच्या डावाला पुन्हा गळती लागली. मेहदी हसन मिराज (०) आणि नुरूल हसन (३१) ठराविक अंतराने बाद झाल्याने बांगलादेशची अवस्था ७ बाद १५९ असी झाली.
मात्र एक बाजू लावून धरणाऱ्या लिटन दासने तळाच्या फलंदाजांसोबत चिवट फलंदाजी करत बांगलादेशला दोनशेपार पोहोचवले. लिटन दासने ७३ धावांची खेळी केली. अखेरीस बांगलादेशचा दुसरा डाव २३१ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून अक्षर पटेलने ३ तर मोहम्मद सिराज आणि अश्विनने प्रत्येकी दोन तर उमेश यादव आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.