India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: पहिल्या दोन सामन्यांत हार झाल्याने भारताने मालिका गमवाली आहे आणि आज अखेरच्या सामन्यात त्यांना उरलेली इभ्रत वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. रोहित शर्मा, दीपक चहर व कुलदीप सेन यांनी दुखापतीमुळे दुसऱ्या वन डे नंतर मालिकेतूनच माघार घेतली आहे. लिटन दासने सलग तिसऱ्या सामन्यात टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या संघात आज दोन बदल पाहायला मिळत आहेत. भारताच्या संघात रोहित शर्मा व दीपक चहर यांच्याजागी कुलदीप यादव व इशान किशन यांना संधी मिळाली. इशानने या संधीचं सोनं केल. इशानने ८५ चेंडूंत वन डे तील पहिले शतक झळकावले. २००३ साली युवराज सिंगने बांगलादेशविरुद्ध पदार्पणाच्या डावात शतक झळकावले होते आणि त्यानंतर इशान हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला.
इशान किशन व शिखर धवन ही जोडी सलामीला आली, परंतु बांगलादेशने पाचव्या षटकात धक्का दिला. धवन ३ धावांवर मेहिदी हसन मिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. विराट कोहली १ धावावर असताना लिटन दासने सोपा झेल सोडला. इशान व विराट यांनी त्यानंतर सावध खेळ करताना बांगलादेशच्या गोलंदाजांना आव्हान दिले. रोहितच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या इशानने चांगली फटकेबाजी करताना अर्धशतक पूर्ण केले. बांगलादेशमध्ये वन डेत सलामीवीर म्हणून ५०+ धावा करणारा इशान हा दुसरा युवा भारतीय फलंदाज ठरल. गौतम गंभीरने २१ वर्ष व १८४ दिवसांचा असताना हा पराक्रम केला होता. इशान आता २४ वर्ष व १४५ दिवसांचा आहे आणि त्याने वीरेंद्र सेहवागचा ( २४ वर्ष व १७३ दिवस) विक्रम मोडला.
इशान व विराट ही जोडी खेळपट्टीवर चांगली सेट झाली आणि या दोघांनी विक्रमी शतकी भागीदारी केली. बांगलादेशमध्ये वन डे त १००० धावा करणारा विराट पहिला भारतीय ठरला. पाहुण्या फलंदाजांत कुमार संगकारा १०४५ धावांसह आघाडीवर आहे. बांगलादेशविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांतही विराटने अव्वल स्थान पटकावले. त्याने १३२०* धावा करताना सचिन तेंडुलकर ( १३१६), रोहित शर्मा ( १२२५) व गौतम गंभीर ( १०२३) यांचा विक्रम मोडला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"