कोलंबो : आशिया कपची अंतिम फेरी गाठल्यानंतर भारतीय संघाला शुक्रवारी बांगलादेशविरुद्ध सामना खेळून औपचारिकता पूर्ण करायची आहे. त्यादृष्टीने या सामन्यात रोहित शर्मा आपल्या संभाव्य खेळाडूंना संधी देण्याच्या विचारात आहे. विशेषत: गोलंदाजांना अधिक संधी मिळेल, असे दिसते.
बुमराहने आतापर्यंत पाकविरुद्ध पाच आणि लंकेविरुद्ध सात अशी १२ षटके गोलंदाजी केली. तो बांगलादेशविरुद्ध खेळून अंतिम लढतीसाठी सज्ज होईल की थेट फायनलमध्ये गोलंदाजी करताना दिसेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मोहम्मद सिराजने १९.२ आणि हार्दिकने १८ षटके गोलंदाजी केली. कोलंबोतील उकाड्यात गोलंदाजांमधील ऊर्जा लवकर संपते. त्यामुळे या दोघांपैकी एकाला ब्रेक मिळू शकतो. सिराजऐवजी मोहम्मद शमीला खेळविण्याचा निर्णय योग्य ठरेल. यामुळे विश्वचषकाआधी वरिष्ठ गोलंदाज या नात्याने त्याला मदत होणार आहे.
दुसरीकडे अक्षर पटेलचा गोलंदाजी ग्राफ खाली येणे हा थिंक टॅंकसाठी चिंतेचा विषय ठरतो. त्याला रवींद्र जडेजाचा कव्हर म्हणून खेळविले जाते. अक्षरने यंदा सात वनडेत केवळ तीन बळी घेतले. शिवाय भरपूर धावा मोजल्या. बांगलादेश संघात मुश्फिकूर रहीम नसल्यामुळे लिटन दास हा यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळेल. कर्णधार शाकिब अल हसन कुटुंबीयांना भेटून संघात परतला आहे.
फलंदाज म्हणून राहुलने मधली फळी भक्कम केली. तो बांगला देशविरुद्धदेखील खेळेल. श्रेयस अय्यरच्या पाठदुखीकडे लक्ष लागले आहे. त्याने गुरुवारी फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव केला. मात्र व्यवस्थापन त्याला आणखी वेळ देण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे ईशान किशन किंवा सूर्यकुमार यादव यांच्यापैकी एकाची अंतिम संघात वर्णी लागेल. सूयराकडे वन डेतील महत्त्वाचा खेळाडू म्हणून पाहिले जाते. त्याला झुकते माप दिले जाईल, असे वाटते.
सामना : दुपारी ३ वाजेपासून, थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स