Shivam Dube, IND vs BAN 1st T20: भारतीय संघाने बांगलादेश विरूद्ध कसोटी मालिकेत २-० ने विजय मिळवला. पहिल्या सामन्यात कसोटीला साजेसा खेळ झाल्यानंतर, दुसरा सामना मात्र अक्षरश: टी२० सारखा खेळला गेला. आता उद्यापासून भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार ऑलराऊंडर शिवम दुबे याने मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians ) दमदार फलंदाज तिलक वर्मा ( Tilak Verma ) याला संघात स्थान मिळाले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शिवम दुबेबाबत माहिती दिली आहे. मंडळाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे हा तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. भारताच्या संघनिवड समितीने शिवम दुबेच्या जागी मुंबई इंडियन्सकडून खेळणारा तिलक वर्मा याला संघात समाविष्ट केले आहे. तिलक वर्मा रविवारी सकाळी ग्वाल्हेरमध्ये येऊन संघात दाखल होईल.
भारताचा सुधारित संघ:- सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव, तिलक वर्मा