Rahul Dravid on KL Rahul Batting: भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल सध्या फॉर्मशी झगडताना दिसतोय. टी२० वर्ल्ड कप सुरू झाल्यापासून पहिल्या तीन सामन्यात मिळून त्याला केवळ २२ धावाच करता आल्या आहेत. ४,९ आणि ९ अशी त्याची तीन सामन्यांतील धावसंख्या आहे. त्यामुळेच लोकेश राहुलला संघातून बाहेर करण्याच्या चर्चा सध्या जोर धरू लागल्या आहेत. बांगलादेश विरूद्ध होणाऱ्या (IND vs BAN) उद्याच्या सामन्यात लोकेश राहुलला संघाबाहेर करावे, अशी मागणी भारतीय चाहते करताना दिसत आहेत. याच दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्याने विविध मुद्द्यांवर उत्तर दिले. यात केएल राहुलच्या फॉर्मबद्दलही द्रविडने मत व्यक्त केले.
"केएल राहुल हा एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीने ही गोष्ट वेळोवेळी सिद्ध केली आहे. तो अतिशय उत्तम फलंदाजी करतो हे आपण साऱ्यांनी पाहिलेले आहे. टी२० क्रिकेटमध्ये फलंदाजाचा फॉर्म जाणे ही गोष्ट बरेचदा घडताना दिसते. ऑस्ट्रेलियातील ही स्पर्धा आव्हानात्मक आहे. राहुलने सराव सामन्यात ६०-७० धावा करून दाखवल्या आहेत. पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कसारख्या गोलंदाजांचा त्याने सामना केला आहे. त्यामुळे अशीच दमदार खेळी त्याच्याकडून पुढील सामन्यात खेळली जाईल," अशी आशा द्रविडने व्यक्त केली.
"केएल राहुलच्या फलंदाजीचा दर्जा आणि त्याची क्षमता आम्हाला माहिती आहे. ऑस्ट्रेलियातील पिचवर खेळण्यासाठी त्याच्यासारखाच फलंदाज महत्त्वाचा आणि गरजेचा असतो. राहुलच्या फलंदाजीच्या शैलीमध्ये वैविध्य आहे. तसेच बाऊन्स होणाऱ्या चेंडूवर बॅकफूटला जाऊन धावा घेण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. त्यामुळे तो या पिचवर नक्कीच उपयुक्त ठरू शकतो. त्याला फार फलंदाजी करता आलेली नाही, पण ज्याप्रकारे त्याने फलंदाजी केली आहे त्यात त्याने चांगले फटके खेळले आहेत हे विसरता येणार नाही," असे द्रविडने अधोरेखित केले.
"आम्ही आमच्या खेळाडूंशी कायमच चर्चा करत असतो. चर्चा नक्की काय होतात, ते सांगणे योग्य ठरणार नाही. पण आम्ही ज्या चर्चा करत असतो त्यातून प्रत्येकाला आपला खेळ सुधारण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्याचा कोचिंग स्टाफचा प्रयत्न असतो. गेल्या वर्षभरात आम्ही या गोष्टींची विशेष काळजी घेत आहोत. लोकेश राहुलला कल्पना आहे की त्याला टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफ आणि इतर खेळाडूंचा पाठिंबा आहे. त्यामुळे केएल राहुलचा फॉर्म हा आमच्या चिंतेचा विषय अजिबातच नाही," असे राहुल द्रविडने स्पष्टपणे सांगितले.