अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
ॲंटिग्वॉ : विजयी रथावर स्वार असलेला भारतीय संघ शनिवारी टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या सुपर आठ लढतीत बांगलादेशविरुद्ध भिडणार आहे. उभय संघांच्या आतापर्यंतच्या वाटचालीवर नजर टाकल्यास भारताचे पारडे जड आहेच. अफगाणिस्तानवर ४७ धावांनी विजय नोंदविणाऱ्या रोहित ॲन्ड कंपनीचा आत्मविश्वास बळावला. सामन्यात आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले, त्याकडे मात्र लक्ष द्यावे लागेल. दुसरीकडे बांगलादेश संघ ऑस्ट्रेलियाकडून पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार पराभूत झाला.
बांगलादेशची खराब कामगिरी
बांगलादेशने सुपर आठमध्ये धडक दिली, पण संपूर्ण वाटचालीत हा संघ कधीही ठोस जाणवलाच नाही. फलंदाजी कुचकामी ठरत असल्याने गोलंदाजांच्या परिश्रमावर पाणी फेरले जात आहे. कोणत्याही संघाला भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध दोन हात करायचे झाल्यास त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी फॉर्ममध्ये असली पाहिजे. भारतीय संघ सामन्यागणिक कामगिरी उंचावत असल्याने बांगलादेशला नमविण्यास थोडीही हयगय करणार नाही. बांगलादेशने भारतावर विजय नोंदविला तर मोठा ‘अपसेट’ ठरेल. पण स्पर्धेतील अपसेटचा इतिहास पाहता भारताला बांगलादेशविरुद्ध सावध राहावे लागेल. विजय मिळताच भारताची उपांत्यफेरी निर्धारित होणार आहे.
भारतीय फलंदाजी भक्कम
भारतीय संघाकडे भक्कम फलंदाजी आहे. अफगाणिस्तानविरुद्ध ६२ धावांत तीन फलंदाज गमविल्यानंतरही मधल्या फळीतील सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी केली तर हार्दिकने झटपट ३२ धावांचे योगदान दिले. दोघांच्या ६० धावांच्या भागीदारीमुळे १८१ पर्यंत मजल गाठता आली. या धावा आव्हानात्मक होत्या. हार्दिकने फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही चुणूक दाखवून आपल्या टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे.
बुमराह-अर्शदीप दमदार
जसप्रीत बुमराह नक्कीच कौतुकास पात्र आहे. कारण त्याने ज्याप्रकारे आतापर्यंत गोलंदाजी केली ते पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले. सध्याच्या घडीला तो आणि पॅट कमिन्स हे जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहेत. बुमराहला डावखुऱ्या अर्शदीप सिंगची योग्य साथ मिळते आहे. जसप्रीत बुमराह हा गेमचेंजर गोलंदाज आहे, तर दुसरीकडे नव्या आणि जुन्या चेंडूचा खुबीने उपयोग करण्यात अर्शदीप वाकबगार आहे. याव्यतिरिक्त तीन डावखुरे फिरकी गोलंदाज जडेजा, अक्षर आणि कुलदीप हे प्रतिस्पर्धी संघाचा बचाव भेदण्यात यशस्वी ठरतात. कुलदीप मनगटाचा वापर करत असल्याने इतरांपेक्षा काकणभर सरस ठरतो.
काही कमकुवत बाजू
भारतीय संघ सलग जिंकत आलेला असला तरी काही गोष्टींची चिंता संघव्यवस्थापनाला सतावत आहे. त्यापैकी एक म्हणजे विराट आणि रोहितची सलामी जोडी. आतापर्यंत पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात दोघांनाही आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आलेला नाही. दुसरे म्हणजे वारंवार संधी मिळूनही अष्टपैलू शिवम दुबे फलंदाजीत सपशेल अपयशी ठरतो आहे. अफगाणिस्तानविरुद्ध आघाडीचे तीन फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर दुबेकडे मोठी खेळी करण्याची संधी होती, पण तो संधीचे सोन्यात रूपांतर करू शकला नाही. त्यामुळे सध्या दुबेव्यतिरिक्त इतर पर्यायांबाबत संघव्यवस्थापनात चर्चा सुरू असेल. संजू सॅमसन एक चांगला पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो किंवा जैस्वालला रोहितसोबत सलामीला पाठवून कोहलीला त्याचा आवडता तीन नंबर देता येऊ शकेल.
बदल अशक्य
कितीही शक्यता वर्तविल्या तरी बांगलादेशसारख्या तुलनेने कमजोर संघाविरुद्ध भारतीय संघात कदाचित कुठलाही बदल केला जाणार नाही. वेस्ट इंडीजसारखा मजबूत संघ असता तर संघात बदल करण्याचा विचार केला जाऊ शकला असता. कारण तुफानी फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या विंडीजच्या फलंदाजांना वेसण घालण्यासाठी कुलदीपच्या जागी युझवेंद्र चहल जास्त उपयुक्त ठरू शकेल. भारतीय संघाचा एकूण ठोकताळा मांडायचा झाल्यास काही अपवाद सोडले तर सर्वच खेळाडू फॉर्ममध्ये आहेत.
Web Title: ind vs ban Defeat Bangladesh play semi final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.