नवी दिल्ली - टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेला सामना कमालीचा रोमांचक झाला. या लढतीत भारतीय संघाने बांगलादेशला डकवर्थ-लुईस नियमानुसार ५ धावांनी पराभूत केले. दरम्यान, भारताच्या या विजयानंतर ट्वीटरवर पुन्हा एकदा #Cheating ट्रेंड होत आहे. बांगलादेश आणि पाकिस्तानचे क्रिकेट फॅन भारतीय संघावर चिटिंगचे आरोप करत आहेत.
या सामन्यात भारतीय संघाने २० षटके फलंदाजी केली होती. मात्र बांगलादेशच्या डावादरम्यान, पाऊस आला. त्यामुळे हा सामना १६ षटकांचा करण्यात आला. आता बांगलादेश आणि पाकिस्तानचे फॅन्स मैदान ओले असतानाही पंचांनी खेळ पुन्हा सुरू करून भारताची बाजू घेतली असा आरोप करत आहेत.
पावसामुळे सामना थांबवण्यात आला तोपर्यंत बांगलादेशने तुफान पाठलाग करताना ७ षटकांमध्ये बिनबाद ६६ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामध्ये लिटन दासच्या २६ चेंडूतील नाबाद ५९ धावांचा समावेश होता. मात्र पावसानंतर खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले आणि सामन्याचे चित्र पालटवून टाकले. या सामन्यानंतर बांगलादेश आणि पाकिस्तानच्या चाहत्यांनी आपलं नैराश्य बाहेर काढण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली.
बांगलादेशच्या संघाला विजयासाठी शेवटच्या ९ षटकांमध्ये ८५ धावांची गरज होती. तसेच त्यांचे सर्व विकेट्स सुरक्षित होते. मात्र आठव्या षटकात लिटन दास धावचित झाला आणि सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटून गेले. भारतीय संघाकडून हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी २-२ बळी टिपले. तर मोहम्मद शमीने एक बळी टिपला.