Join us  

IND vs BAN : १६-१८ वर्षांच्या पोरांनाही हे कळतं, पण...! पाकिस्तानच्या माजी खेळाडूने रोहित शर्माचे काढले वाभाडे 

India vs Bangladesh : वन डे क्रिकेटमधील भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी बांगलादेशमध्येही दिसली...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 5:10 PM

Open in App

India vs Bangladesh : वन डे क्रिकेटमधील भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी बांगलादेशमध्येही दिसली... यजमान बांगलादेशने पहिल्या वन डे सामन्यात १ विकेट राखून थरारक विजयाची नोंद करताना मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. १८६ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची अवस्था ९ बाद १३६ धावा अशी झाली होती. आता सामना भारताचाच असे वाटले होते, परंतु मेहिदी हसनने (  Mehidy Hasan) अखेरच्या विकेटसोबत खिंड लढवली. मेहिदी व मुश्ताफिजूर यांनी दहाव्या विकेटसाठी वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम ५१ धावांची भागीदारी करताना बांगलादेशला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. भारताला शेवटची एक विकेट घेता न आल्याने रोहित शर्माच्या नेतृत्वकौशल्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित राहू लागले आहेत.

दुष्काळात तेरावा महिना! बांगलादेशने टीम इंडियाची जीरवली अन् आता रोहित अँड टीमच्या खिशाला कात्री

या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने १७ धावा देताना २ विकेट्स घेतल्या, पंरतु एवढी चांगली गोलंदाजी करूनही त्याला केवळ ५ षटकं टाकण्याची संधी दिली गेली. यावर पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कानेरियाने टीका केली. ''रोहित शर्माने कालच्या लढतीत बरेच चुकीचे निर्णय घेतले. भारतात परतल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरकडून गोलंदाजी करून घेणार आहात का? रोहित काय करत होता, हे समजण्यापलीकडचे होते,''असे कानेरिया म्हणाला.

डावखुरा फलंदाज मुस्ताफिजूर खेळपट्टीवर असताना वॉशिंग्टनला गोलंदाजीला का आणले नाही, असा सवाल कानेरियाने केला. तो म्हणाला,'' वॉशिंग्टन सुंदरची पाच षटकं शिल्लक होती. मुस्ताफिजूर रहमान डावखुरा फलंदाज आहे आणि १६-१८ वर्षांच्या मुलांनीही हे सांगितलं असतं की डावखुरा फलंदाज आहे, तर ऑफ स्पिनरला आणायला हवं. सुंदर या खेळपट्टीवर चेंडू चांगले वळवत होता, परंतु रोहितने त्याला गोलंदाजीला आणले नाही.''

शाकिब अल हसनने ( Shakib Al Hasan) भारतीय फलंदाजांना नाक घासायला भाग पाडले. शाकिबची ( ५-३६) कामगिरी ही भारताविरूद्ध वन डे क्रिकेटमधील डावखुऱ्या फिरकीपटूची सर्वोत्तम कामगिरी ठरली.  इबादत होसैनने चार विकेट्स घेतल्या आणि भारताचा डाव १८६ धावांवर गुंडाळला.  भारताकडून लोकेश राहुलने ७० चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात लिटन दास ( ४१) वगळता आघाडीच्या फलंदाजांनी माना टाकल्या. ९ बाद १३६ धावांवरून बांगलादेशचे पुनरागमन अशक्यच होते, परंतु मेहिदी हसन ( ३८*) आणि मुस्ताफिजूर रहमना  (१०*) यांनी ५१ धावांची विक्रमी भागीदारी केली.   

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशरोहित शर्मावॉशिंग्टन सुंदर
Open in App