अॅडिलेड - पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत व्हावे लागल्याने भारतीय संघाला धक्का बसला होता. त्यामुळे उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी टीम इंडियाला बुधवारी बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास भारताची उपांत्य फेरीची वाट सोपी होईल. मात्र अॅडिलेडमध्ये होत असलेल्या या सामन्यावर खराब हवामानाचं सावट आहे. आज अॅडिलेडमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, त्यामुळे उद्या होणाऱ्या सामन्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना हा भारतीय वेळेनुसार बुधवारी दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे. मात्र मंगळवारी सातत्याने पाऊस पडत असल्याने चिंता वाढली आहे. बुधवारी हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियामध्ये असलेले वातावरण पाहता असं होण कठीण दिसत आहे. बुधवारचा हवामानाचा अंदाज पाहिल्यास पाऊस पडण्याची शक्यता ही सुमारे २० टक्के एवढी आहे.
वेदर.कॉमच्या अंदाजानुसार बुधवारी अॅडिलेडमध्ये दिवसा सुमारे २० टक्के एवढा पाऊस पडू शकतो. तर संध्याकाळी ही शक्यता ५० टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. बुधवारी अॅडिलेडमध्ये दिवसा १६ डिग्री तर रात्री १० डिग्रीपर्यंत राहू शकते. यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये अनेक सामने पावसामुळे रद्द करावे लागले आहेत. त्यामुळे गुणतालिकेवर खूप फरक पडला आहे. त्यामुळे उद्या पावसाचा व्यत्यय आल्यास टीम इंडियाच्या उपांत्यफेरीच्या वाटेतही अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाने आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. त्यामधील दोन सामन्यात संघाला विजय मिळवला आहे, तर एका सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. जर भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. त्यामुळे दोन्ही संघांचे ४ सामन्यातून ५ गुण होतील.