ढाका - बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. माफक धावसंख्येचा बचाव करताना बांगलादेशच्या ९ फलंदाजांना माघारी धाडल्यानंतरही अखेरच्या विकेटसाठी झालेल्या ५१ धावांच्या भागीदारीमुळे विजयाचा घास टीम इंडियाच्या तोंडातून हिरावला गेला. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू मेहदी हसन मिराज याने मुस्तफिजुर रहमानच्या साथीने बांगलादेशला अशक्यप्राय विजय मिळवून दिला.
भारतावर मिळवलेल्या या विजयानंतर मेहदी हसन मिराजने विजयामागचं गुपित उघड केलं आहे. ४० व्या षटकात बांगलादेशची अवस्था ४ बाद १२८ वरून ९ बाद १३६ अशी झाली होती. तसेच महमदुल्ला आणि मुशफिकूर रहिमसारखे सिनियर फलंदाज बाद झाले तेव्हा भारतीय संघ हा सामना आरामात जिंकेल असं वाटलं होतं. मात्र मुस्तफिजूर रहमानने मेहदी हसन मिराजला उत्तम साथ दिली. त्याने दोन चौकारांसह १० धावा काढल्या. तर मेहदी हसन मिराजने चार चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ३८ धावा काढल्या.
या विजयाबाबत मेहदी हसन म्हणाला की, मी खरोखर खूप उत्साहित आहे. मुस्तफिजूर आणि मी ठरवले होते की आम्हाला विश्वास ठेवला पाहिजे. मी मुस्तफिजूरला केवळ शांत राहण्यास आणि २० चेंडू खेळण्यास सांगितले होते. तर मी केवळ एका ठिकाणावर लक्ष केंद्रित करण्यावर आणि त्या रणनीतीवर विश्वार करण्याबाबत विचार करत होतो.
बांगलादेशला रोमांचक विजय मिळवून देणाऱ्या मेहदी हसनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याबाबत मेहदी हसनने सांगितले की, मी गोलंदाजीचा आनंद घेत आहे. मी प्रत्येक चेंडूवर विकेट घेण्याचा प्रयत्न केला. ही कामगिरी माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. मेहदी हसन मिराज आणि मुस्तफिजूर रहमान यांनी दहाव्या विकेटसाठी केलेली ५१ धावांची भागीदारी ही बांगलादेशसाठी १०व्या विकेटसाठी करण्यात आलेली दुसरी सर्वात मोठी तर धावांचा यशस्वी पाठलाग करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील झालेली चौथी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे.