ND vs BAN WTC Points Table: भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना कानपूरच्या ग्रीन पार्कवर खेळवण्यात येत आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवशी फक्त ३५ षटकांचा खेळ झाला. दुसऱ्या दिवशीही लंचपर्यंत खेळ सुरु झाला नाही. उर्वरित तीन दिवसांचा खेळ पूर्ण झाला तर टीम इंडिया पाहुण्यांचा खेळ खल्लास करून क्लीन स्वीपसह मालिका खिशात घालेल. पण जर पाऊस खलनायक ठरला तर त्याचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील गुणतालिकेतवर कसा परिणाम होईल हा प्रश्नही निर्माण होत आहे.
कानपूर कसोटी सामना अनिर्णित राहिला तर कुणाला बसेल फटका?
सध्याच्या घडीला रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या बाजूला बांगलादेशचा संघ सहाव्या स्थानावर आहे. WTC पॉइंट्स टेबलमध्ये भारताच्या खात्यातील विनिंग पर्सेंटेजचा आकडा हा ७१.६७ इतका आहे. दुसरीकडे बांगलादेश संघाचा विनिंग पर्सेंटेजचा आकडा ३९.२९ असा आहे. जर पावसाच्या खेळात हा सामना अनिर्णित राहिला तर बांगलादेशच्या तुलनेत भारतीय संघालाच त्याचा फटका बसेल.
इथं समजून घ्या विनिंग पर्सेंटेजच गणित
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील कसोटी सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना प्रत्येकी ४-४ गुण दिले जातात. याउलट जिंकणाऱ्या संघाला १२ गुण मिळतात. सामन्याचा निकाल लागला नाही तर त्याचा थेट विनिंग पर्सेंटेजवर परिणाम होतो. जर कानपूर कसोटीचा निकाल लागला नाही तर भारतीय संघाचे विनिंग पर्सेंटेज ६८.१८ इतके होईल. याउलट सामना जिंकला तर भारतीय संघ ७४.२४ अशा विनिंग पर्सेंटेजसह आपले स्थान आणखी भक्कम करेल. कानपूर कसोटी सामना अनिर्णित राहिला तर बांगलादेश संघाचा विनिंग पर्सेंटेजचा आकडा हा ३८.५४ असा होईल. जर त्यांनी सामना जिंकला तर ते ४६.८७ विनिंग पर्सेंटेजसह टॉप ४ मध्ये एन्ट्री मारू शकतात. पण ते अशक्यच वाटते.
सोपा प्रवास खडतर न करता
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलच्या शर्यतीत भारतीय संघ आघाडीवर आहे. पण शेवटच्या टप्प्यातही टीम इंडियाला सातत्य कायम राखावे लागेल. बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासह भारतीय संघाला ९ पैकी किमान ५ सामन्यात विजय मिळवावा लागेल. कानपूरमधील कसोटी सामन्यानंतर टीम इंडिया घरच्या मैदानात न्यूझीलंड विरुद्ध ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच सामन्यांची मालिका खेळायची आहे. दुसरीकडे श्रीलंकेचा संघही जोमात दिसत असून तेही भारत आणि ऑस्ट्रेलियापाठोपाठ आपली दावेदारी भक्कम करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय संघाला बांगलादेश विरुद्धचा सामना निकाली लागणे फायद्याचे आहे. अन्यथा पुढे जर तरच्या समीकरणात अडकण्याची स्थिती निर्माण होऊ शकते.