मुंबई - भारत आआणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आज खेळवला जाणार आहे. ही मालिका भारतीय संघाने आधीच ०-२ अशा फरकाने गमावली आहे. आता भारतीय संघासमोर मालिकेत क्लीन स्विप होण्याचं संकट उभं ठाकलं आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाला या मालिकेमध्ये एका खेळाडूची उणीव सातत्याने भासत आहे. या खेळाडूने गेल्या काही मालिकांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. मात्र या दौऱ्यासाठी त्याला संघातून विश्रांती देण्यात आली होती.
निवड समितीने बांगलादेश दौऱ्यासाठी युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याला संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्याला विश्रांती देण्यात आली होती. भारतीय संघाला या मालिकेत अर्शदीप सिंहची उणीव प्रकर्षाने जाणवली. अर्शदीपच्या अनुपस्थितीत भारतीय वेगवाग गोलंदाज मोक्याच्या क्षणी अपयशी ठरले.
अर्शदीप सिंहने हल्लीच न्यूझीलंड दौऱ्यावर आपला पहिला सामना खेळला होता. या मालिकेमध्ये कर्णधार शिखर धवनने त्याला तीनही सामन्यात खेळण्याची संधी दिली होती. मात्र त्याला एकही बळी टिपता आला नव्हता. मात्र संपूर्ण मालिकेत अर्शदीपला केवळ १३.१ षटकेच गोलंदाजी करायला मिळाली होती.
अर्शदीप सिंहने आतापर्यंत २१ टी-२० सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये अर्शदीप सिंहने ८.१७ च्या सरासरीने ३३ बळी टिपले आहेत. अर्शदीप आशिया चषक आणि टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा भाग होता. या दोन्ही स्पर्धांमध्येही त्याने लक्षवेधी कामगिरी केली होती.