भारतीय संघाने चेन्नईच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात २८० धावांनी दिमाखदार विजय नोंदवला. या विजयासह दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघ कानपूर कसोटी जिंकून पाहुण्यांना क्लीन स्वीप देण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
बुमराहला विश्रांती; कुलदीप यादवला मिळू शकते संधी
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानात खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने दुसऱ्या कसोटीसाठी पहिल्या कसोटीसाठी निवडलेला संघ कायम ठेवला आहे. पण कानपूर कसोटीमध्ये भारतीय संघ नव्या बदलासह मैदानात उतरल्याचे पाहायला मिळू शकते. चेन्नईच्या मैदानात भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला होता. पण कानपूरच्या खेळपट्टीवर हा गेम प्लान उपयुक्त ठरणार नाही. या परिस्थितीत जसप्रीत बुमराहला विश्रांती देऊन टीम इंडिया कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देऊ शकते. भारतीय संघ आगामी काळात सातत्यपूर्ण कसोटी मालिका खेळणार आहे. जसप्रीत बुमराह हा संघातील प्रमुख खेळाडू आहे. त्यामुळे वर्कलोड मॅनेजमेंटच्या दृष्टीने हा निर्णय सर्वोत्तमच ठरेल.
लोकेश राहुलसाठी धोक्याची घंटा
बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात बँच स्ट्रेंथ दाखवून देण्याची संधीही टीम इंडियाकडे आहे. या प्रयोग मनावर घेतला तर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सर्फराज खानची टीम इंडियात एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळेल. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यासाठी मग लोकेश राहुलला बाहेर बसवावे लागेल. जर सर्फराज खाननं संधीच सोन केलं तर ती लोकेश राहुलसाठी ती धोक्याची घंटाही ठरू शकते.
रोहित-विराटवर असतील सर्वांच्या नजरा
यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा ही जोडी भारताच्या डावाला सुरुवात करेल. शुभमन गिल आणि विराट कोहली तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फिक्स आहेत. गिलने दुसऱ्या डावात दमदार शतक झळकावले पण कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भात्यातून धावा आलेल्या नाहीत. या दोघांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील. दुसऱ्या सामन्यातही पंत पाचव्या क्रमांकावर खेळणार की, लोकेशची जागी खेळणारा सर्फराजला संधी मिळणार ते पाहण्याजोगे असेल. अश्विन आणि जडेजाच्या जोडीला कुलदीप यादवची साथ मिळाली तर भारतीय फिरकीची ताकद आणखी वाढेल. मोहम्मद सिराज आणि आकाश दीप ही जोडी वेगवान गोलंदाजीची धूरा सांभाळताना दिसू शकते. दुसऱ्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सरफराज खान, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप, मोहम्मद सिराज